आईची हत्या करून मृतदेह माथेरानच्या दरीत फेकला; मुलाला आणि नोकराला अटक

132
एका ४५ वर्षीय मुलाने ७४ वर्षाच्या आईची हत्या करून नोकराच्या मदतीने मृतदेह माथेरानच्या दरीत फेकल्याची खळबळजनक घटना मुंबईतील जुहू परिसरात घडली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी मुलाला आणि नोकराला अटक केली असून मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.
सचिन कपूर (४५) आणि छोटू उर्फ लालू कुमार मंडल (२५) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे आणि नोकराचे नाव आहे. विना कपूर (७४) या जुहू येथील गुलमोहेर रोड नंबर ५, किशोर कुमार गार्डन जवळ असणाऱ्या कल्पतरू सोसायटी येथे मुलगा सचिन सोबत राहण्यास होत्या. त्यांचा मोठा मुलगा हा अमेरिकेत स्थायिक आहे. सचिन हा ट्युशन क्लासेस चालवतो, त्यांच्या घरी घरकामासाठी छोटू उर्फ लालूकुमार मंडल कामाला होता.
मंगळवारी मोठा मुलगा आईला फोन करत होता, मात्र आई फोन उचलत नसल्यामुळे त्याने सोसायटीच्या सुरक्षा रक्षक सुपरवायझरला फोन करून चौकशी केली, परंतु घराला टाळे असल्याचे त्याने परदेशात असलेल्या मुलाला कळवले आणि विना कपूर या हरवल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल केली. जुहू पोलिस विना कपूर यांचा शोध घेण्यासाठी रात्री सोसायटीत आले. त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या सुपरवायझरकडे चौकशी केली असता सचिन आणि विना या मायलेकात संपत्तीवरून वाद सुरू असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याची एक प्रत सोसायटीकडे जमा असल्याचे त्यांना समजले.
पोलिसांनी सचिन आणि विना यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता विना कपूर यांच्या मोबाईलचे लोकेशन घराजवळ दाखवत होते तर सचिन याचे लोकेशन पनवेल रायगड जिल्ह्यात दाखवत होते. दरम्यान पोलिसांनी सोसायटीत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सचिन आणि नोकर हे दोघे एक बॉक्स घेऊन मोटारीतून जात असल्याचे दिसून आले. पोलिसांना संशय येताच पोलिसांनी या दोघांवर पाळत ठेवली.  दरम्यान बुधवारी सकाळी हे दोघे जुहू येथील माऊली सोसायटी रोड नंबर १३ येथे आल्याची माहिती कळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली.  या चौकशीत सचिन याने गुन्ह्याची कबुली दिली.
संपत्तीच्या वादातून मंगळवारी आईसोबत त्याचे कडाक्याचे भांडण झाले.  या भांडणातून सचिन याने बेसबॉलच्या बॅटने आईला मारहाण करून तिची हत्या केली. त्यानंतर नोकराच्या मदतीने आईचा मृतदेह एका बॉक्समध्ये बंद करून माथेरान येथे आले आणि तिथून एका उंच दरीतून तो बॉक्स टाकला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुलगा सचीन कपूर आणि नोकर छोटू उर्फ लालूकुमार मंडल या दोघांना अटक केली आहे. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक माथेरानच्या दिशेने रवाना झाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.