डान्सबारमध्ये जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला करून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कुर्ला पश्चिम येथून समोर आली आहे. पतीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून कुर्ला पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
शबीना सर्फराज खान (२९)असे जखमी पत्नीचे नाव आहे. कुर्ला पश्चिम एलबीएस मार्ग येथील इंदिरा नगर याठिकाणी शबिना ही पती सर्फराज सोबत वास्तव्यास आहे. शबिना हिच्या पतीला डान्सबारचे व्यसन आहे. घरातून पैसे घेऊन तो बाराबालावर उडवत असतो. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्याने बारमध्ये जाण्यासाठी पत्नीकडे १ लाख रुपयांची मागणी केली, परंतु पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन सर्फराज याने पत्नीला मारहाण करून तीचे डोके काचेच्या कपाटावर आदळले. त्यानंतर त्याने घरात असलेल्या लहान आकाराच्या तलवारीने पत्नीवर वार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शबिनाला शेजाऱ्यांनी उपचारासाठी भाभा रुग्णालय दाखल केले आहे.
गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक
या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्फराज याला ताब्यात घेतले. सर्फराज विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र होवाळे यांनी दिली.