माटुंग्यातील प्रसिद्ध ‘म्हैसूर कॅफे’ (Mysore Cafe) मालकाच्या सायन येथील घरावर दरोडा टाकून २५ लाख रुपयांची लूट करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी पोलीस असल्याचे सांगून लोकसभा निवडणुकीसाठी असलेला पैसा घरात दडवून ठेवल्याचे सांगून म्हैसूर कॅफे मालकाच्या घरातील २५ लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस आणि पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा- South Mumbai LS Constituency : सफाई कामगाराची सून निवडणूक रिंगणात, महापालिका कामगारांमध्ये उत्साह)
माटुंगा येथील माहेश्वरी उद्यान या ठिकाणी असलेल्या म्हैसूर कॅफे (Mysore Cafe) या हॉटेलचे मालक नरेश नायक (Naresh Nayak) हे सायन रुग्णालयासमोर असलेल्या एका इमारतीत राहात होते. सोमवारी दुपारी ६ इसम त्यांच्या घरी आले आणि त्यांनी ‘आम्ही मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आहोत’, असे मालक नरेश नायक (Naresh Nayak) यांना सांगितले. त्यातील दोघांनी मुंबई पोलिसांचे ओळखपत्रही दाखवले. आम्ही निवडणूक ड्युटीवर असून तुमच्या घरात निवडणुकीसाठी लागणारी मोठी रक्कम असल्याची माहिती आम्हाला मिळाली, असे सांगून ६ जणांपैकी चौघांनी घराची झडती घेऊन कपाटातील २५ लाख रुपयांची रोकड बाहेर काढली. नरेश नायक यांनी ही रोकड हॉटेल व्यवसायातील असल्याचे सांगूनदेखील त्यांनी नरेश नायक यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन प्रकरण मिटविण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी नायक यांच्याकडे केली आणि त्यांना धमकीही दिली. त्यांनी ‘एवढी रक्कम माझ्याकडे नाही’, असे सांगताच टोळीने २५ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. (Mumbai Crime)
ते ६ इसम घरातील रक्कम घेऊन पळून गेल्यानंतर आपली फसवणूक झाली आहे, हे नायक यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायन पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायन पोलिसांनी भादवी कलम १७० , ४२० (फसवणूक), ४५२ (दुखापत, प्राणघातक हल्ला किंवा चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करणे) ५०६ (गुन्हेगारी धमकावणे) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा- Indian soldier Vaibhav Kale: गाझा युद्धात पहिल्यांदा ‘या’ भारतीय जवानाला वीरमरण, इस्रायलने दिले चौकशीचे आदेश)
पोलिसांनी आणि फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पीडित नरेश नायक यांच्या घराची सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली, तेव्हा या गुन्ह्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आले. रात्री उशिरा सायन पोलिसांनी सेवानिवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलीस कर्मचारी या दोघांना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. हा गुन्हा करणाऱ्या ६ जणांनी पोलिसांच्या वाहनाचा वापर केला, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community