१५ फुटाचा लोखंडी रॉड १७ व्या मजल्यावरून रिक्षावर पडला, मायलेकीचा जागीच मृत्यू

181

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून १५ फुटाचा लोखंडी रॉड धावत्या रिक्षावर पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७ वर्षाच्या मुलीसह आईचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी जोगेश्वरी पूर्व येथे घडली. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी बांधकाम कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा : मुंबईचे तापमान ३८ अंशावर! मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस? काय आहे हवामान विभागाचा अंदाज )

शमा बानो शेख (२९) आणि अयात शफीक शेख (७) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आई व मुलीचे नाव आहे. जोगेश्वरी पूर्व प्रताप नगर या ठिकाणी या दोघी कुटुंबासह राहत होत्या. पश्चिम द्रुतगती महामार्ग रेल्वे स्थानक रोड या ठिकाणी ‘एयम कन्स्ट्रक्शन’ कंपनीकडून एसआरए प्रकल्प राबविण्यात येत असून या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शमा बानो ही मुलीला शाळेतून रिक्षाने घरी घेऊन जात असताना एयम कन्स्ट्रक्शन कंपनीचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १७व्या मजल्यावरून १५ फुटाचा लोखंडी रॉड शमा प्रवास करीत असलेल्या रिक्षावर पडून त्यात मायलेकी दोघी गंभीर जखमी झाल्या, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी स्थानिकांच्या आणि रिक्षा चालकाच्या मदतीने जखमी मायलेकींना रिक्षातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी दोघींना तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसानी संबंधित कंपनीच्या बांधकाम कंत्राटदार आणि आणि सुपरवायझर यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.