पाकिस्तानी नागरिक सीमा गुलाम हैदरला तिच्या देशात परत न पाठवल्यास “२६/११ सारखा दहशतवादी हल्ला” पुन्हा घडवून आणू अशा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रूमच्या व्हाट्सअप क्रमांकावर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर व्हॉट्सअॅप धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी शोध सुरू केला आहे. सीमा हैदर हि एका भारतीय पुरुषाच्या प्रेमात पडून आपल्या चार मुलासह पाकिस्तान मधून बेकायदेशीररीत्या भारतात दाखल झाली आहे
सीमा गुलाम हैदर हि पाकिस्तानी विवाहित महिला आहे, तिला चार मुले असून तिचा पती दुबई येथे कामानिमित्त राहण्यास आहे. ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या २२ वर्षीय सचिन मीना या भारतीय तरुणाच्या प्रेमात सीमा हैदर पडली, सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून या दोघांनी एकत्र राहण्याचा विचार करून सीमा हैदर हि आपल्या चार मुलांसह या महिन्याच्या सुरुवातीलाच बेकायदेशीररीत्या भारतात आली होती. सीमा हैदरला या महिन्याच्या सुरुवातीला इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन करून भारतात प्रवेश केल्याबद्दल अटक केली होती. तिला आश्रय दिल्याबद्दल सचिन मीना (२२) आणि त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला बुधवारी त्यांच्या हेल्पलाइन नंबरवर एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅप संदेश प्राप्त झाला, ज्याची सुरुवात +1 (929) या कोडने झाली. पाकिस्तानी असल्याची बतावणी करणाऱ्या संशयिताने उर्दूमध्ये संदेश लिहिला होता. जर सीमा हैदर परत आली नाही तर भारतात २६/११ सारख्या (दहशतवादी) हल्ल्याच्या पुनरागमनासाठी स्वतःला तयार करा, या हल्ल्यासाठी उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल,” असे मेसेज मध्ये धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या समकक्षांनाही माहिती दिली असून ते संशयिताचा शोध घेत आहेत. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितला २०१९मधील घटनाक्रम; म्हणाले उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची घेतली खोटी शपथ)
Join Our WhatsApp Community