मुंबईतील (Mumbai Police) बोरिवली येथे घडलेल्या घटनेची शहरासह उपनगरात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी अलर्ट राहावे, असे तोंडी आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत. पूर्ववैमनस्य, राजकीय वाद याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन कुठलीही विपरीत घटना घडू नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत.
उल्हासनगर आणि बोरिवली येथे घडलेल्या घटनेतून राजकीय वाद तसेच राजकारणाशी संबंधित पूर्ववैमन्यस्य समोर आलेले असताना या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. राजकारण आणि राजकीय व्यक्तिंशी संबंधित असणारे तसेच त्यांच्यातील वाद, पूर्ववैमनस्याची संपूर्ण माहिती व सध्याच्या घडामोडीवर लक्ष ठेवण्याचे तोंडी आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुंबई पोलीस दलाला देण्यात आलेले आहेत.
(हेही वाचा – Indian Army Agniveer Recruitment 2024: अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू, कसा कराल अर्ज ? वाचा सविस्तर )
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ‘मिल्स स्पेशल’ (Mills Special) यांना दक्ष राहून सर्व राजकीय तसेच इतर घडामोडी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे.
शस्त्र परवाने तपासा….
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे राजकीय, व्यावसायिक तसेच सुरक्षारक्षक यांच्याकडे असणाऱ्या शस्त्राच्या परवान्याची माहिती घेण्यात यावी त्याच बरोबर ज्यांच्या परवान्याचा कालावधी संपला आहे किंवा ज्यांच्याकडे परवानेच नाहीत किंवा बोगस परवाने बाळगणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात यावी, असेही आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील अनेक सुरक्षा रक्षक स्वतःकडे परराज्यातील शस्त्र परवाने बाळगत आहेत. त्यातील अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत तसेच ज्यांच्या परवान्यांची मुदत संपली आहे त्यांची शस्त्र परवाने जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community