पोलिसांची बनावट ओळखपत्रे बनवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

सायबर गुन्हेगारांनी आता थेट मुंबई पोलिसांच्या ओळख पत्राचा वापर करून लोकांकडून ऑनलाइन खंडणी उकळण्यास सुरुवात केली आहे. अशीच एक घटना माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बाबतीत घडली आहे. बनावट ओळखपत्र तयार करून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परंतु हे प्रकरण वेळीच समोर आल्यामुळे मुंबई पोलिसांकडून सतर्कता पाळण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या घटनांना बळी पडू नका असे आवाहन केले आहे.

( हेही वाचा : तुर्कीनंतर आता तजाकिस्तान हादरले! 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप, चीनमध्येही जाणवले धक्के)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपूर्वी सायबर गुन्हेगारांकडून मुंबई पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटरून माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांचे छायाचित्र आणि ओळखपत्र डाउनलोड करण्यात आले आहे. या ओळखपत्रावर चव्हाण यांचा फोटो लावून ‘नरेश गुप्ता बॅनर्जी’ असे नाव टाकून बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले. हे ओळखपत्र लोकांना व्हॉट्सअ‍ॅपवर तसेच इन्स्टाग्राम वर पाठवून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ऑनलाइन मार्गाने पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले.

हा प्रकार चव्हाण यांच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत घडला व त्यांनी याबाबतची सूचना चव्हाण यांना दिल्यानंतर चव्हाण यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून नागरिकांनी यास बळी पडू नये, व सायबर गुन्हेगारांच्या या कृत्याला बळी न पडता कुठल्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून करण्यात आले आहे.

यापूर्वी देखील सायबर गुन्हेगारांनी दिल्ली, राजस्थान पोलिसांच्या नावाने धमकी देऊन लोकांकडून ऑनलाइन मोठ्या रकमा उकळल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला होता, त्यात कुणाची आर्थिक फसवणूक झालेली नाही. मात्र या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे कृत्य करणाऱ्या सायबर गुन्हेगाराचा पोलिसांचे सायबर पथक शोध घेत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here