थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी वाहनातून बाहेर पडणाऱ्या तळीरामांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ‘ब्रिथ अॅनलायझर’चे शस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढले आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षे बंद ठेवण्यात आलेली वाहन चालकांची ब्रिथ अॅनलायझर तपासणी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून मुंबईत करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई पोलीस आयुक्तांनी या सूचना दिल्या आहेत.
( हेही वाचा : नववर्षात मुंबईत ‘बेस्ट’चे स्मार्ट वीज मीटर, मोबाईलप्रमाणे करता येईल प्रिपेड रिचार्ज)
“गेली दोन वर्षे मुंबईसह राज्यात निर्बंध होते, पण यावेळी असे कोणतेही निर्बंध नाहीत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी नवीन वर्ष साजरे केले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची अपेक्षा आहे. त्याआधारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस तैनात केले जातील,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे, आम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणांसाठी ब्रिथ अॅनलायझरचा वापर करणार आहोत,” अधिकारी पुढे म्हणाले. शहरातील कोविड-१९ लाट हाताळण्यात मुंबई पोलिस आघाडीवर आहेत आणि या प्रक्रियेत अनेक पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. पोलिस विभागात कोरोनाची लागण होऊ नये अथवा वाहन चालकांना त्यांचा त्रास होऊ नये यासाठी ब्रिथ अॅनलायझरचा वापर बंद करण्यात आला होता.
यावेळी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत तसेच नाकाबंदीत वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी ब्रिथ अॅनलायझरचा वापर करण्यात येणार असून वाहतूक पोलिसांनी तसेच अधिकार्यांनी ब्रिथ अॅनलायझरचा वापर करताना हँड सॅनिटायझर वापरणे यासारखी योग्य खबरदारी घ्यावी यासाठी चर्चा झाली आहे. असे वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
थर्टीफर्स्ट दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची पायी गस्त वाढविण्यात आल्याचे एक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय दहशतवाद विरोधी पथक, छेडछाड विरोधी पथक, बॉम्ब शोधक व निकामी पथक आणि निर्भया पथके शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह आणि शहरातील सर्व समुद्रकिनारे अशा गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल आणि दंगल नियंत्रण पोलिस तैनात केले जातील. पोलीस ड्रोन आणि फिरत्या सीसीटीव्ही व्हॅनचाही वापर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community