मुंबईसह इतर शहरांमध्ये भीक मागण्यासाठी लहान मुले चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या कांजूरमार्ग पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. विदर्भ तसेच मराठवाडा येथून येणाऱ्या एका विशिष्ट जमातीच्या टोळीतील तिघांना औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या तावडीतून ५ वर्षाची मुलगी आणि १ वर्षाच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
( हेही वाचा : १६ डिसेंबरला मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक)
कांजूरमार्ग पूर्व रेल्वेस्थानकाच्या शेजारी राहणाऱ्या एका दाम्पत्याची ५ वर्षाची मुलगी आणि १ वर्षाचा मुलाला ४ डिसेंबर रोजी एका भीक मागणाऱ्या टोळीने पळवून घेऊन गेल्याची तक्रार कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या टोळीच्या शोध घेऊन मुलाची सुटका करण्यासाठी परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी विशेष पथक गठीत केले होते. विशेष पथकात परिमंडळ ७ मधील विवध पोलीस ठाण्यातील अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते.
रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमुळे तपासाला वेग
तपास पथकाने विविध रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून या टोळीचा माग घेतला असता ही टोळी मुलांना घेऊन कल्याण आणि तेथून पुणे येथे गेल्याची माहिती मिळाली, पोलिस पथक पुण्याला रवाना झाले, मात्र ही टोळी तेथून सटकली आणि कोल्हापूर, नंतर सांगली, नगर त्यानंतर औरंगाबाद येथे गेल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलीस पथक दहा दिवस अहोरात्र या टोळीच्या मागावर होते, दरम्यान सांगली येथे सीसीटीव्ही फुटेज मधील एका व्यक्तीचे नाव तपास पथकाला कळाले व पोलिसांनी माहिती मिळवली असता ही टोळी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात राहणारी असल्याचे समजले, पोलीस पथक सांगली येथून नगर आणि नगर येथून औरंगाबाद येथे या टोळीच्या शोधात दाखल झाले, औरंगाबाद येथील जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यातून ४० वर्षीय महिलेसह दोन पुरुषांना अटक करून त्याच्या ताब्यातून मुलाची सुटका करण्यात आली.
भीक मागण्यासाठी मुलाची चोरी…
मुंबई आणि इतर शहरात फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांची चोरी करून या मुलांना भीक मागण्यासाठी यात्रेत पाठवले जाते, तसेच मुंबई आणि महत्वाच्या शहरात चोरलेल्या मुलांचा वापर भीक मागण्यासाठी केला जात होता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुले मोठी झाल्यावर त्यांना अपंग केले जाते. मुले चोरी करणारी ही एक विशिष्ट जमात असून या जमातीत पूर्वी चोऱ्या, दरोड्यासारखे भीषण गुन्हे केले जात होते, अटक करण्यात आलेल्या तिघींपैकी एकावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community