मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेची सोनसाखळी खेचून पळणाऱ्या २८ वर्षीय इसमाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला इसम दुसरा तिसरा कोणी नसून त्याच इमारतीत काम करणारा मनपाचा कंत्राटी कर्मचारी निघाला. पैशांची निकड असल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सफाई कर्मचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीवर त्याची मागील काही दिवसांपासून नजर होती, व तीची सोनसाखळी चोरी करण्याचा कट त्याने आखला. (Mumbai Crime)
त्यासाठी त्याने कुर्ला येथून चार जोडी कपडे खरेदी केले आणि सोनसाखळी चोरी करण्यापासून ते कार्यालयात पुन्हा कामावर येईपर्यंत चार वेळा कपडे बदलले होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. आबासाहेब बाड (२८) असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. आबासाहेब हा मूळचा सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे राहणारा आहे. नुकताच त्याचा विवाह झाला असून पत्नी गावीच राहण्यास असते. आबासाहेब बाड हा उच्चशिक्षित असून माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या कृष्णा बोर्डिंग इमारतीच्या शेजारी असणाऱ्या माटुंगा बाजार, लाल बहादूर शास्त्री मंडई या इमारतीत मनपा कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकरी करतो. या इमारतीत मनपाचे रुग्णालय असून त्या रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून भीमा कुंचिकुरवे ही महिला काम करते. (Mumbai Crime)
भीमा हिच्या गळ्यात असलेली दोन तोळ्यांची सोनसाखळी आबासाहेब याच्या सतत नजरेत येत असे. त्यात त्याला पैशांची निकड असल्यामुळे त्याने भीमाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याची योजना आखली. चोरी करायची मात्र पकडले जाऊ नये ही देखील काळजी आबासाहेब याने घेतली. त्यासाठी त्याने कुर्ला येथून नवीनच चार जोडी कपडे विकत आणले, व चोरी करण्याच्या एक दिवस अगोदरच त्याने ते कपडे तो काम करीत असलेल्या इमारतीत असलेल्या सार्वजनिक शौचालयात लपून ठेवले होते. (Mumbai Crime)
१६ ऑक्टोबर रोजी आबासाहेब हा सकाळी ९ वाजता चेहऱ्याला मास्क आणि रुमाल बांधून आला. भीमा ही सफाई कर्मचारी महिला साफसफाईसाठी रुग्णालय उघडत असताना त्याने भीमाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला आणि थेट माटुंगा रेल्वे स्थानक गाठले. तेथून तो चिंचपोकळी येथे आला व रेल्वे स्थानकजवळ असणाऱ्या सुलभ शौचालयात जाऊन त्याने कपडे बदलले, व अंगावरील कपडे तेथेच टाकून तेथून बाहेर पडला. येथून तो पुन्हा माटुंगा येथे काम करीत असलेल्या ठिकाणी आला व तेथील शौचालयात जाऊन त्याने पुन्हा पूर्ण कपडे बदली केले आणि त्याला काहीच माहीत नाही असे दाखवत कामावर नेहमीप्रमाणे रुजू झाला. भीमाने माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, आणि पोलिसांनी तपास सुरू केला. (Mumbai Crime)
माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाला सुचना दिल्या. पो. उप. निरी. विनोद पाटील, स. पोउनी. कांगणे, अंमलदार चव्हाण, पाटील, तांबे, गजभारे, उंडे, नीहारे या पथकाने परिसरातील सुमारे ७० ते ७५ सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासले. त्यात पोलीस पथकाला चिंचपोकळी येथील एका सुलभ शौचालयातून बाहेर पडताना एका व्यक्तीचे सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्या हालचालीचा माग घेत पोलीस पथक घटनास्थळी पोहचले, त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चिंचपोकळी येथील फुटेज मधील संशयास्पद व्यक्ती आढळून आली. (Mumbai Crime)
या सर्व फुटेजचा अभ्यास करून पोलीस पथक आबासाहेब याच्यापर्यंत पोहचली. परंतु आबासाहेब हा चार दिवस सुट्टी घेऊन गावी गेल्याचे कळले. पोलीस पथकाने आबासाहेब याचे गाव गाठून येथून त्याला अटक करून मुंबईत आणले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने चोरलेली सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे. पैशांची निकड असल्यामुळे त्याने चोरीची योजना आखली तसेच आपण पकडले जाऊ नये म्हणून सतत पेहराव बदलत होतो, अशी कबुली पोलिसांना दिली असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितले. (Mumbai Crime)
Join Our WhatsApp Community