‘नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होता’, असे म्हणता येणार नाही. तो त्या घटनेनंतर आलेली तात्काळ प्रतिक्रिया होती. तो काही तासांतच घडला. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, याचे कोणतेही पुरावे दिसून येत नाहीत. नागपूर पोलीस तपास करत आहेत. त्यांना काही पुरावे सापडले, तर हिंसाचार पूर्वनियोजित असण्याविषयी भाष्य करू शकतो. हा हिंसाचार हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे, असे म्हणता येणार नाही. सध्या सामाजिक माध्यमे सतत वापरली जातात. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर संदेश जाताच मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरु, दिल्ली या शहरांत मोठ्या प्रमाणावर १०-१५ मिनिटांत लोक रस्त्यावर उतरले. याला फ्लॅश क्राऊड म्हणतात. त्यामुळेच सामाजिक माध्यमांवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) यांनी केले आहे. ते एका प्रसारमाध्यमाशी बोलत होते. (Nagpur Violence)
(हेही वाचा – Malegaon Blast प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितांना सैन्य अधिकाऱ्यांनी गोवले; abinewz.com चा धक्कादायक खुलासा)
प्रवीण दीक्षित पुढे म्हणाले की, नागपूरमध्ये झालेला हिंसाचार हा काश्मीर पॅटर्न होता, असे म्हणता येणार नाही. हे खरे आहे की, सामाजिक माध्यमांतून (Social Media) संदेश गेल्यानंतर काही वेळातच दगड आणि विटा यांसारख्या बांधकाम साहित्याने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली आणल्या गेल्या. घरांची तोडफोड झाली, वाहने जाळली गेली. मोठा हिंसाचार झालेला असला, तरी नागपूरने यापूर्वी अशा घटना पाहिलेल्या नाहीत, असे म्हणणे योग्य होणार नाही. यापूर्वी यापेक्षा गंभीर घटनाही घडल्या आहेत. पोलिसी बळाचाही वापर केला गेला आहे. अनेक वेळा पोलिसांनी त्यांच्या स्तरावर असे हिंसाचार शमवले आहेत.
या घटनेतून काय शिकले पाहिजे ?
- सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सामाजिक माध्यमांवर आताही तांत्रिक नियंत्रण असले, तरी त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे तांत्रिक नियंत्रणासोबत मानवी सहभाग आवश्यक आहे. तांत्रिक हे केंद्रीय स्तरावर केले जाते. त्यामुळे तांत्रिक निरीक्षण आताही होत असले, तरी त्याला काही मर्यादा आहेत.
- मी पोलीस महासंचालक असतांना प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस मित्रांची नियुक्ती केली होती. ते शांतता राखण्यात मदत करतात. तसेच समाजात अशांतता पसरवणाऱ्यांना तात्काळ ओळखतात. पोलीस मित्र तात्काळ काम करतात आणि विश्वासार्ह आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेतली गेली पाहिजे.
- मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली यांसारख्या शहरांत संवेदनशील ठिकाणी नाकाबंदी केली गेली पाहिजे; कारण प्रत्येक वेळी घटनास्थळावरून पोलीस स्टेशन जवळच असेल, असे नाही. त्यामुळे अशा मोठ्या शहरांतील संवेदनशील ठिकाणी वायरलेस यंत्रणा, महिला पोलीस, पोलीस मित्र आणि वाहन त्यांच्याजवळ असले पाहिजे.
- रस्त्यांच्या बाजूला पडलेले बांधकाम साहित्य, विटा, दुकानांबाहेर पडलेले टायर हे शस्त्र म्हणून वापरले जातात. महानगरांत उघड्यावर पडलेले बांधकाम साहित्य अडचणीच निर्माण करणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून हे साहित्य लवकरात लवकर हटवले पाहिजे.
- प्रत्येक ६ महिन्यांनी मॉकड्रिल (Mock Drill) केले पाहिजे. पोलीस आणि अन्य अन्वेषण यंत्रणा यांच्या सहकार्याने हे व्हावे. त्यामुळे अशा घटना कधीही घडल्या तरी पोलीस परिस्थितीला सामोरे जायला तयार असतील.
- मोठ्या शहरांत गुन्हेगार, सामाजिक शांततेला अडथळा ठरू शकणाऱ्या व्यक्ती यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- नागपूर येथील घटनेत बांग्लादेश आणि म्यानमारच्या घुसखोरांचा सहभाग असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे बनावट कागदपत्रे असलेल्यांना शोधण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कुशल अधिकारी असावा.
- अमली पदार्थांचा (Drugs and Violence) हिंसाचार, शस्त्रे, आतंकवादी कारवाया यांच्याशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे अमली पदार्थांचे व्यवहार रोखण्यासाठी सातत्याने कारवाई झाली पाहिजे.
- नागपूरच्या घटनेत हिरवे कापड जाळले गेल्याची अफवा पसरवली गेली. त्याचा व्हिडिओ करून पसरवला गेला. सामाजिक माध्यमांवर बंदी घातली जाऊ शकत नाही; पण लक्ष ठेवले जाऊ शकते. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि पोलीस मित्र यांनी सामाजिक माध्यमांवरील समूहांचे सदस्य व्हावे, जेणेकरून असे भडकावू संदेश पसरवले जात असतांना लगेच नोंद घेतली जाऊ शकते. (Nagpur Violence)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community