नवाब मलिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी हवी असल्यास ते खरंच आजारी आहे हे आम्हाला पटवून द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मलिकांच्या जामीन अर्जाला ईडीतर्फे विरोध करण्यात आला. मलिक हे पीएमएलए कायद्यातील कलम ४५ मधील तरतुदीनुसार आजारी नाहीत असा दावा करण्यात आला आहे. यावर उच्च न्यायालयाने नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करत २१ फेब्रुवारीच्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांना केवळ मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले आहेत.
( हेही वाचा : आर्थिक सल्लागार समितीच्या पहिल्याच बैठकीला अदानी पुत्राची दांडी; चर्चांना उधाण)
नवाब मलिकांची एक किडनी निकामी झाली असून ते सध्या एकाच किडनीवर आहेत. तरीही ईडी त्यांच्या डिस्चार्जसाठी घाई करत आहे असा दावा मलिकांकडून करण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयामध्ये दाखल आहेत मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करायचे आहेत अशी माहिती मलिकांच्या वकिलाकडून देण्यात आली आहे.
मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशांनुसार मलिकांची सरकारी वकिलांकडून चाचणी पूर्ण झाली असून तो अहवाल कोर्टात प्रलंबित आहे त्यावर विशेष न्यायालयात लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. नवाब मलिकांनी वैद्यकीय स्थितीमुळे जामिनासाठी अर्ज केला होता परंतु ईडीने मलिक यांचे वैद्यकीय चाचणीचे अहवाल मागवले होते. ईडीच्या मागणीला मलिकांनी विरोध केला त्यामुळे जर मलिक हे गंभीर आजारी असतील तर त्यांनी स्वत:हून तपासयंत्रणेला अहवाल देणे आवश्यक होते. मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर न केल्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे विशेष न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community