ड्रग्स माफियांकडून पाळीव प्राण्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती एनसीबीच्या कारवाईत समोर आली आहे. एनसीबीने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने एक ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑपरेशनमध्ये एनसीबीने ड्रग्स माफियांनी ड्रग्सच्या पैशांतून खरेदी केलेली मालमत्ता जप्त करण्यात सुरुवात केली आहे. एनसीबीच्या सूत्रानुसार मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी ही जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली असून एनसीबीने आतापर्यंत ड्रग्स माफियांची जवळपास हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. काही ड्रग्स माफियांनी आपल्या पाळीव प्राण्यांच्या नावाने मालमत्ता खरेदी केली असल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील डोंगरी, मस्जिद, कुलाबा आणि इतर भागातील मालमत्तेची माहिती ब्युरोला मिळाली आहे. जी मालमत्ता ड्रग्स माफियांनी अंमली पदार्थांच्या व्यापारातून कमावलेल्या पैशातून बेनामी नावाने खरेदी केलेली आहे. या माफियांनी राज्यातील इतर भागांमध्ये गोदामे आणि इतर मालमत्तांमध्येही गुंतवणूक केल्याचे समजते. पाळीव कुत्रे आणि मांजरांच्या नावावरही मालमत्ता खरेदी केल्या गेल्या आहेत. माफियांकडे निर्यात-आयात व्यवसाय, भंगार साहित्य आणि रिअल इस्टेटसाठी कंपन्यांच्या रूपात आघाडीच्या संघटना आहेत.
(हेही वाचा – Overconsumption Of Salt : अतिरिक्त मिठाच्या सेवनाने मिळते आजारांना निमंत्रण)
ड्रग माफिया त्यांचा पैसा बेनामी मालमत्तेमध्ये वळवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एनसीबीने शोधून काढले की ड्रग्स माफियांशी संलग्न काही मालमत्ता कुत्रे आणि मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांच्या नावाखाली नोंदणीकृत आहेत, जेणेकरून या बेनामी मालमत्तेचा तपास यंत्रणांना सुगावा लागू नये व जप्तीची कारवाई रोखण्यासाठी त्यांनी पाळीव प्राण्याच्या नावाने ही मालमत्ता खरेदी केली आहे.
त्याच बरोबर ड्रग्स माफीयांनी ड्रग्सच्या पैशांतून घेतलेली बेनामी मालमत्ता लपवण्यासाठी आणखी एक क्लुप्ती तयार केली असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे. मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या ड्रग्स माफिया महिलेच्या नावावर १५ फ्लॅट आहे, हे सर्व फ्लॅट खरेदी करताना तीने कुटुंबातील सदस्यांनाच्या नावाने खरेदी केले आहे, आणि या सदस्यांच्या नावातील काही अक्षरे बदलली जेणेकरून ड्रग्स माफियांचा त्या मालमत्तेशी संबंध येऊ नये यासाठी आधारकार्ड आणि पॅन कार्डच्या नावातही थोडा बदल करून ही मालमत्ता खरेदी केली असल्याचे समोर आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community