माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणे Jitendra Awhad यांना भोवले

237
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणे Jitendra Awhad यांना भोवले

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या दंगली प्रकरणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना चांगलेच भोवले आहे. मुंबईतील पी. डिमेलो रोड, वाडीबंदर येथे गुरुवारी सायंकाळी आव्हाड यांच्या वाहनावर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात जितेंद्र आव्हाड थोडक्यात बचावले असून या हल्ल्याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात स्वराज्य संघटनेचे धनराज जाधव, अंकुश कदम यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. याचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वाहनाला गुरुवारी मुंबईत लक्ष्य केले. आव्हाड हे मुंबईतील कामकाज आटोपून ठाणे येथील घरी परतत होते. त्यांचे वाहन पी. डिमेलो रोड येथून पूर्व मुक्त महामार्गावरुन जाण्यापूर्वी वाडीबंदर येथे वाहतूक कोंडीत अडकले होते, त्याच वेळी दुसऱ्या वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी हातात लाठ्या काठ्या तसेच दगडाने आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला केला.

(हेही वाचा – Crime : गोवंडीतून १६२ चोरीच्या मोबाईलसह ५ जणांना अटक; चोरीचे मोबाईल जातात कुठे?)

अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही – आव्हाड

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या चालकांनी तात्काळ गाडी पूर्व मुक्त महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने पळवल्यामुळे आव्हाड हे थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला. डोंगरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या हल्ल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी स्वराज्य संघटनेचे नेते धनराज जाधव, अंकुश कदम यांच्या सह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

हल्ल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केला. आपल्या सोबत चार पोलीस होते. पण, मी त्या तरुणांवर कोणताही हल्ला करण्यास सांगितले नाही. मी अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगडाबाबत बोललो कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिला आहे, तो संभाजीराजेंनी पुढे न्यायला पाहीजे होता. पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन असे तुम्हाला वाटत असेल पण तसे होणार नाही. मी आणखी त्वेषाने तुमच्याविरोधात बोलणार आहे. आतापर्यंत तुम्हाला आदरार्थी बोलत होतो, पण आता मी बोलण्यासाठी मोकळा आहे, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.