पोलिसांना भारी पडताहेत गुन्हेगारांचे खबरी!

176

पोलिसांच्या खबऱ्यांपेक्षा गुन्हेगारांचे खबऱ्यांचे नेटवर्क अधिक मजबूत असल्याची प्रचिती मुंबई पोलिसांना ‘ऑपरेशन आंबिवली ईराणी वस्ती’ दरम्यान आली. सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी जाताना त्याची खबर गुन्हेगार किंवा त्याच्या नातलगांना लागू नये म्हणून पोलिसांनी पूर्णपणे काळजी घेतली तरी देखील ईराणी वस्तीत पोलीस आल्याची माहिती अगोदरच येऊन धडकली होती. पोलीस पथकाने आपली मोहीम फत्ते तर केली परंतु येथील नागरिकांच्या विरोधाला तोंड देत व स्वतःचा बचाव करीत पोलिसांनी ही मोहीम यशस्वी केली.

संपूर्ण महाराष्ट्रात तसेच गुजरात राज्यात गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार मोहम्मद उर्फ संगा जाकिर फर्जद सय्यद (२५) याला कल्याण जवळ असलेल्या आंबिवलीतील ईराणी वस्तीतून अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ११ मधील पोलीस ठाण्यामधील विविध अधिकारी आणि अंमलदार असे २६ जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

नियोजनबद्ध योजना आखली तरीही….

आरोपीच्या मागावर पूर्वीच काही खबरी सोडण्यात आले होते, ते पोलिसांना आरोपी मोहम्मद उर्फ संगा याची माहिती देत होते. ईराणी वस्तीत कारवाईसाठी जाणार असल्याची माहिती केवळ विशेष पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना आणि काही अंमलदारांनाच होती. ही बातमी फुटू नये म्हणून पथकाने सर्वतोपरी काळजी घेतली होती. ‘ऑपरेशन आंबिवली ईराणी वस्ती’ राबविण्यासाठी पोलीस वाहनांचा वापर न करता खाजगी वाहने आणि अॅम्ब्युलन्सचा वापर करण्यात आला होता. आरोपीला पकडेपर्यंत ईराणी वस्तीत पोलीस आल्याची बातमी फुटू नये म्हणून पुरेपूर काळजी घेण्यात आली होती, ही योजना स्वतः पोलीस उपायुक्तांनी आखली होती.

आणि खबर लागली….

विशेष पथकाने गावाबाहेर थांबून तीन टीम तयार करून प्रत्येक टीमवर वेगवेगळी जवाबदारी देण्यात आली होती. प्रत्येकांने सर्वतोपरी काळजी घेतली होती, जशी टीम आंबिवली गावात दाखल झाली याची खबर ईराणी वस्तीत फुटली, वस्तीबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर बसलेल्या आरोपी मोहम्मद उर्फ संगा जाकिर सय्यद याला देखील याची कुणकुण लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत ‘स्पेशल २६’ अधिकाऱ्यांचे पथक त्याच्या पर्यंत दाखल झाले. त्याला उचलून अॅम्ब्युलन्समध्ये टाकेपर्यत आणि त्यांनतर आंबिवली गावाबाहेर जाण्यासाठी पोलिसांना इराणी महिला आणि पुरुषांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.

इराणी गुन्हेगार असे पेरतात खबरी….

या इराणी वस्तीतून आरोपींना अटक करायची असेल तर गावाच्या बाहेर योजना आखून आरोपीला संधी न देता त्याला घेराव घालून अटक केली जाते, व काही कळण्याच्या आत त्याला वस्तीतून बाहेर काढले जाते. आंबिवली गावामध्ये कोणतीही नवीन व्यक्ती आल्यास त्याची खबर तात्काळ या इराणी लोकांना मिळते तसेच या गावांमध्ये कोणतेही नवीन वाहने आल्यास गुन्हेगारांचे खबरी ते वाहन वस्तीपासून दूर जात नाही तोपर्यंत त्या वाहनाचा पाठलाग करीत असतो. पोलिसांची गाडी आली तर त्याची माहिती वस्तीवर अगोदरच पोहोचवण्यासाठी या इराणी लोकांनी तशा प्रकारचे खबरी गावाच्या सुरुवातीला बसवलेले आहेत. गावामध्ये प्रवेश करण्यासाठी एक नदी आहे त्या नदीवरील पूल हा गावात येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग आहे. गावामध्ये येण्यासाठी हा एकच ब्रिज असल्यामुळे या इराणी लोकांना पोलिसांची खबर लगेचच गावामध्ये मिळते व हे इराणी आरोपी सतर्क होतात. अशा या इराणी आरोपीला त्यांच्या वस्तीतून उचलणे हे खूप मोठे अवघड होऊन जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.