श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. त्या माहितीनुसार आता सर्व वृत्तवाहिन्यांना या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यास दिल्ली न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. श्रद्धाच्या हत्येला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. मात्र अजूनही ह्या हत्याकांड मागील गूढ सर्वांपर्यंत पोहचलेल नाही. अशातच आता दिल्ली न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची कोणतीही माहिती वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित होऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार सोमवारी म्हणजेच १० एप्रिल रोजी न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे. वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सतत यासंबंधी बातम्या प्रसारित होत राहिल्या तर याचा श्रद्धाच्या कुटुंबियांवर वाईट परिणाम होईल. त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल म्हणून दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राकेश कुमार सिंह यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.
(हेही वाचा ‘एकनाथ शिंदेंना उडवणार’, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात)
त्या आदेशानुसार आता सध्या कोणत्याही वृत्तवाहिन्यांना श्रद्धा वालकर हत्या प्रकरण संबंधी कोणतीही माहिती दाखवता येणार नाही. मात्र येत्या १७ एप्रिल रोजी या आदेशाची सविस्तर सुनावणी केली जाणार आहे. तोपर्यंत कोणतीही माहिती प्रसारित करतांना न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. विनापरवानगी माहिती प्रसारित केल्यास न्यायालयाकडून कारवाई करण्यात येईल.
Join Our WhatsApp Community