धक्कादायक! ड्रग्ज तस्करीसाठी नायजेरियन टोळ्यांकडून भारतीय महिलांचा वापर

149

भारतीय महिलांसोबत लग्न करून त्यांना ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात लोटण्याचा धक्कादायक प्रकार नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून सुरू आहे. एनसीबीने नुकत्याच केलेल्या कारवाईत अटक केलेल्या एका भारतीय महिलेच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे. अटक करण्यात आलेली महिला ही मूळची दिल्ली येथे राहणारी असून तिला नायजेरियन नागरिक असलेल्या ड्रग्ज माफियाकडून तीन मुले झालेली आहे.

( हेही वाचा : भाजप बेस्ट कामगार संघाचा वेतन करार पूर्ण; अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने देशभरात ड्रग्ज माफियांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत एनसीबीने दिल्ली, हरियाणा, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये केलेल्या कारवाईत ड्रग्जच्या धंद्यात असलेल्या नायजेरीन नागरिकांसह काही भारतीयांना अटक केली आहे. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे पाच किलो कोकेन जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला ही मूळची दिल्ली येथे राहणारी असून तिला मुंबईत ड्रग्ज पुरवठा करतेवेळी अटक करण्यात आलेली आहे, तिच्याकडे एनसीबीला २ किलो कोकेन हा अमली पदार्थ सापडला आहे. अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकांपैकी ही महिला मुख्य आरोपीची पत्नी आहे, टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या नायजेरियन नागरिकाने या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या सोबत लग्न केले, त्यानंतर व्हिसा संपल्यानंतर देखील तो भारतात राहून ड्रग्जचा व्यापार करीत होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या या ड्रग्ज सिंडिकेटमधील तो मुख्य आरोपी असून त्याने या ड्रग्जच्या धंद्यात आपल्या पत्नीचा वापर करण्यास सुरुवात केली, परदेशातून येणाऱ्या ड्रग्जची भारतात तस्करी करण्यासाठी त्याने आपल्या पत्नीचा वापर सुरू केला होता, मुंबईसह इतर राज्यातील महत्वाच्या ठिकाणी ड्रग्ज पुरवठा करणे, ड्रग्जचा साठा दडवून ठेवणे, इतर ड्रग्ज तस्करांना आश्रय देणे यासारखी कामे नायजेरियन टोळ्या भारतीय पत्नीकडून करून घेत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

एनसीबीने केलेल्या कारवाईत नायजेरियन टोळ्यांची ट्रान्स-नॅशनल ड्रग सिंडिकेट ही नवीन कार्यपद्धती असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात मोठ्या प्रमाणात नायजेरीन टोळ्या कार्यरत असून भारतातील अनेक राज्यात या टोळ्यांचे बस्तान असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यातील महत्वाच्या शहरांजवळील दाट वस्तीत या टोळ्या राहत असून तेथूनच त्यांचा हा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.