सांताक्रूझ पाठोपाठ बोरिवलीत नायलॉन मांजाने (Nylone Manja) मुंबईत दुसरा बळी घेतला आहे. तर विलेपार्ले येथे एक जण मांजामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार आणि सोमवारी समोर आली आहे. सोमवारी दुपारी काही कामानिमित्त बोरिवली येथे मोटार सायकलवर गेलेल्या धारावीच्या तरुणाच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकून त्याचा गळा चिरला असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान विलेपार्ले पूर्व येथे एका सुरक्षा अधिकाऱ्याचा गळा मांजाने कापला गेला, त्यात हे अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वरळी बीडीडी पोलीस वसाहत येथे राहणारे व दिंडोशी पोलीस ठाण्यात तैनात असणारे समीर जाधव हे मोटार सायकल वरून घरी जात असताना वाकोला उड्डाणपूलावर त्यांच्या गळ्याभोवती कापलेल्या पतंगाचा मांजा लपटून त्यांचा गळा चिरून त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून बंदी असलेल्या नायलॉन मांजा (Nylone Manja) विक्रेत्यांवर तसेच नायलॉन मांजा वापरून पतंग उडवणाऱ्यावर कारवाई सुरू केली होती. या पोलिसांच्या कारवाई नंतर नायलॉन मांजा विक्रेते आणि पतंग उडविणाऱ्यावर कुठलाही फरक पडलेला दिसून आलेला नसल्याचे बोरिवली आणि विलेपार्ले येथे घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे. मुंबईच्या बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाणपुलावर मोटारसायकल वरून निघालेल्या मोहम्मद शेख फारुकी (२१) या धारावीत राहनाऱ्या तरुणाचा नायलॉनचा मांजाने बळी घेतला आहे.
सोमवारी दुपारी मोहम्मद शेख दुचाकीवरुन जात असताना बोरिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोरा केंद्र उड्डाणपुलावर पतंगाच्या नायलॉन मांजाने (Nylone Manja) त्याचा गळा कापला गेला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात पतंग उडवणाऱ्या अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी पश्चिम द्रुतगती मार्ग विलेपार्ले पूर्व येथे नायलॉन मांजा गळ्याला अडकून दुचाकी असलेले जालिंदर भगवान नेमाने (४१) हे गंभीर जखमी झाले. नेमाने हे एका खाजगी कंपनीत सुरक्षा अधिकारी आहेत, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Join Our WhatsApp Community