२६ जानेवारी रोजी संपूर्ण देशात दारू बंदी असताना देखील मुंबईच्या रस्त्यावर एका ‘स्ट्रगलर मॉडेल’ असलेल्या तरुणीने भरदिवसा भररस्त्यात मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत एका महिला पोलीस अधिकारी आणि महिला अंमलदार यांना मारहाण केल्याची घटना विलेपार्ले पूर्व विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी या ३५ वर्षीय मॉडेल विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
पोलिसांनी तिला ताब्यात घेतले
रुपाली जितेंद्र कुमार असे या मॉडेलचे नाव आहे, मूळची दिल्ली येथे राहणारी ही मॉडेल मुंबईत मॉडेलींग क्षेत्रात आपले नशीब आजमविण्यासाठी आली होती. २६ जानेवारी रोजी देशात एकदिवसीय दारू विक्री बंदी (ड्राय डे ) असताना ही मॉडेल विलेपार्ले विमानतळ येथील रिक्षा स्टॅन्ड जवळ मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली. दरम्यान महिला पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेतली असता ही मॉडेल मद्यधुंद अवस्थेत महिला पोलीस अधिकारी यांच्याशी हुज्जत घालून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत होती. घटनास्थळी दाखल झालेल्या महिला पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ती रस्त्यावर अधिकच गोंधळ घालीत असल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
(हेही वाचा कोण संजय राऊत, मी ओळखत नाही; प्रकाश आंबेडकर पुन्हा गरजले)
पोलिस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी यांनी तिला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकच गोंधळ घालून पोलिसांच्या अंगावर धावून जाऊ लागली. महिला पोलीस अधिकारी यांनी तिला अखेर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तिने महिला पोलीस अधिकारी याच्यावर हात उगारत मारहाण केली, अखेर पोलिसांना बळाचा वापर करून तिला नियंत्रणात आणून तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, धमकी देणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community