सोन्याचे भाव साठीनजीक पोहोचल्यापासून हवाई मार्गाने सोने तस्करीचे प्रकार वाढले आहेत. अशा तस्करांना लगाम घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अहोरात्र मेहनत करीत असताना, आता सोने तस्करीची पाळेमुळे थेट विमानतळ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचू लागली आहेत. शुक्रवारी पहाटे मुंबई विमानतळावर असाच एक प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आल्या आहेत.
मुंबई विमानतळावर लोडिंगचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या संशयास्पद हालचाली हेरून तेथे तैनात असलेल्या सीमाशुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याने त्याला रोखले. त्याची झाडाझडती घेतली असता पायातील बुटांमध्ये सोने लपविल्याचे दिसून आले. त्यामुळे सीमाशुल्क विभागाचे हवालदार सुधाकर शिंदे यांनी त्याची कसून तपासणी केली. तेव्हा त्याच्याकडे जवळपास १ किलो सोने आढळून आले.
संबंधित विमानतळ कर्मचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याला हे सोने कोणी दिले, यामागचा सूत्रधार कोण, याचा शोध सीमाशुल्क विभागाकडून घेतला जात आहे.
आणखी कोणकोण सामील?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका परदेशी प्रवाशाने हवाई मार्गे हे सोने भारतात आणले. मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्याने ते या विमानतळ कर्मचाऱ्याकडे दिले. जेणेकरून चेक आउट करताना आपली तस्करी पकडली जाऊ नये. पुढे जाऊन हा विमानतळ कर्मचारी ते सर्व सोने अन्य एका माणसाकडे सुपूर्द करणार होता. त्यामुळे या तस्करीमागे नेमका कुणाचा हात आहे, आणखी किती विमानतळ कर्मचारी यात गुंतले आहेत, याचा तपास सीमाशुल्क विभागाकडून केला जात आहे.