शहरासह उपनगरामध्ये ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्याचे पेव फुटले आहे. या ऑनलाइन जुगाराच्या नादी लागून अनेक संसार उध्वस्त होत असून तरुण पिढी देखील या नादाला लागून बरबादीच्या वाटेवर आहे. या बेकायदेशीर ऑनलाइन जुगाराच्या अड्ड्यांवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठवड्याभरापासून कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेने मागील काही दिवसांत मुंबईसह उपनगरातील डझनभर बेकायदेशीर ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Online Gambling)
मुंबई शहरासह उपनगरात जागोजागी बेकायदेशीररित्या ऑनलाइन जुगाराचे अड्डे चालवले जात आहे. राजश्री लॉटरी तसेच इतर कायदेशीर ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली या लॉटरी सेंटरमध्ये वेगवेगळ्या नावाने ऑनलाइन जुगार (Online Gambling) खेळावला जातो. १० रुपयांना ९० रुपये, १०० रुपयांना ९०० रुपयांचा परतावा देण्याच्या नावाखाली शहरात मोठी लूटमार सुरू आहे. या ऑनलाइन लॉटरीच्या नादाला लागून अनेक संसार उध्वस्त होत आहे. तसेच तरुण पिढी या ऑनलाइन जुगारापायी चोरी, घरफोड्या सारखे गुन्हे करीत आहे. घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांनी नुकतीच एक कारवाई करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या तरुणाला अटक केली, त्याच्या चौकशीत त्याने तो ऑनलाइन जुगाराचे व्यसन लागले असून त्या साठी तो मोटार सायकल चोरी करून त्या विकून येणाऱ्या पैशांतून जुगाराचा नाद पूर्ण करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. (Online Gambling)
(हेही वाचा – Parle Festival: २३वा ‘पार्ले महोत्सव’ शनिवारपासून सुरू होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन)
ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली बेकायदेशीर सुरू असणाऱ्या या जुगाराच्या अड्ड्यांना स्थानिक पोलीस ठाण्याचे अभय मिळत होते, अखेर या बेकायदेशीर जुगाराचे अड्डे बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा पुढे सरसावली आहे. गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्त यांच्या आदेशावरून मुंबई गुन्हे शाखेच्या मुंबईतील प्रत्येक युनिटने मागील एक आठवड्यापासून ऑनलाइन लॉटरी सेंटरवर छापेमारी सुरू केली आहे. गुन्हे शाखा कक्ष १च्या पथकाने एमआरए मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथील शॉप क्र. १६१ या ठिकाणी छापा टाकून ‘कॅनव्हास गेमिंग’ च्या नावाखाली सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार चालविणाऱ्या सह चार जणांना ताब्यात घेण्यात आले. (Online Gambling)
दरम्यान युनिट ७ च्या पथकाने विक्रोळी पार्कसाईड येथे शमसी एंटरप्राइजेस येथे सुरू असलेल्या अथर्व ऑनलाइन सेंटरवर छापा टाकला, या ठिकाणी युनिक लॉटरीच्या नावाखाली जुगाराचा अड्डा चालविला जात होता. युनिट ७ च्या पथकाने याप्रकरणी ७ जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली. युनिट ३ च्या पथकांने लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील लॉटरी सेंटरवर छापा टाकून ५ जणांना ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मालाड पश्चिम येथे युनिट ११ कडून छापेमारी करण्यात आली असून ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकारे गुन्हे शाखेने विविध ठिकाणी छापेमारी करून जवळपास दोन डझन पेक्षा अधिक जणांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बेकायदेशीर ऑनलाइन जुगारावरील कारवाई यापुढे सुरुच राहणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे. (Online Gambling)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community