ऑनलाइन पार्टटाईम जॉब रॅकेट; मुंबईत ५४० गुन्ह्यांची नोंद

156
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले, याचा फायदा ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी घेतला. ऑनलाइन जॉब शोधणाऱ्या बेरोजगारांची नोकरीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या १० महिन्यांच्या कालावधीत एकट्या मुंबईत ५४० जणांची पार्टटाईम जॉब, परदेशात नोकरीचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. यापैकी केवळ १८ गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे.

चार आफ्रिकन नागरिकांना पुण्यातून अटक

ही केवळ मुंबईची आकडेवारी असून राज्यभरात ऑनलाईन जॉब रॅकेटकडून फसवणूक झालेल्यांचे प्रमाण हजारोंच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने नुकताच एक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार आफ्रिकन नागरिकांना पुण्यातून अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. ही टोळी मोबाईल फोनवर तसेच सोशल मीडिया आणि ई मेल च्या माध्यमातून परदेशात बड्या नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून वेगवेगळी कारणे सांगून ऑनलाइन रक्कम भरायला सांगून फसवणूक करीत होती. या टोळीकडे दोन लाख ईमेल आयडी आणि एक लाख मोबाइल फोन नंबर मिळाले आहेत, ज्याद्वारे ते ऑनलाइन फसवणूक करत होते.

२०२० मध्येही उघड झालेला गुन्हा

दरम्यान वर्षभरापूर्वी मानखुर्द पोलिसांनी एका ऑनलाइन पार्टटाईम जॉब रॅकेट प्रकरणी सोहेल खान याला अटक केली होती. साहिल खान हा देवनार येथील हनुमान सोसायटीत राहणारा आहे. २०२० मध्ये, जेव्हा कोविड महामारीमुळे लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू लागले, तेव्हा खान यांनी ‘ओएलएक्स’ या वेबसाइटचा आधार घेत एक जाहिरात पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने चांगल्या पगाराच्या फ्रीलान्स नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवत होता. “खान याच्या जाहिरातीला गरजूंकडून प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांच्याशी अनेकांनी फोनवर संपर्क साधला. तो प्रथम त्यांच्याकडून ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली किरकोळ रक्कम घेत असे आणि नंतर त्यांना घरबसल्या अनुवादित करण्यासाठी काही पुस्तके पाठवत होता, त्यानंतर अनुवाद करण्यात आलेल्या लिखाणातील कामात चुका काढून त्यांच्या कामामुळे ‘क्लायंट’चे नुकसान झाले आहे असे सांगून फसवणूक झालेल्याकडून नुकसान भरपाईच्या नावाखाली आणखी पैसे उकळत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक ऑनलाइन जॉब प्रकरणात पूर्णपणे खात्री केल्याशिवाय कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये अथवा कारारपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व माहिती घ्यावी की, हा करार खरा आहे की खोटा, त्याच बरोबर आर्थिक व्यवहार करताना खात्री करून घ्यावी असे सायबर पोलिसांच्या एका अधिका-याने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.