‘ऑपरेशन आंबिवली ईराणी वस्ती’ दगडांचा मारा झेलत मुंबई पोलिसांकडून मिशन फत्ते

214
ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या कुशीत वसलेल्या आंबिवलीच्या ईराणी वाडीतून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन आंबिवली ईराणी वाडी’ राबवले. मुंबई पोलिसांच्या ‘स्पेशल २६’ या टीमने ईराणी वाडीतून एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ईराणी वस्तीतील नागरिकांचा  हल्ला, त्यात दगडांचा मारा अंगावर झेलत पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला रुग्णवाहिकेत कोंबून मुंबईत आणले.
मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी पटलावर ‘टॉप लिस्ट’ मध्ये असणारा सराईत गुन्हेगार मोहम्मद जाकिर सय्यद उर्फ सांगा (२५) ठाणे जिल्ह्यातील आंबिवलीमध्ये असणाऱ्या ईराणी वाडीत लपून बसला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त यांना मिळाली. या माहितीच्या आधारे या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी एमएचबी, चारकोप, बोरिवली आणि मालाड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार या २६ जणांचे विशेष पथक गठीत करण्यात आले होते.
सर्वात प्रथम या गुन्हेगाराचा ठावठिकाणा, तो कुठे उठतो, कुठे बसतो, कुणाला भेटतो याची माहिती गोळा करण्यात आली असता एमएचबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि पोउनि. अखिलेश बोंबे यांना मिळालेल्या खब-याच्या माहितीवरून आरोपी मोहम्मद जाकिर हा शनिवारी सायंकाळी ५ वाजता ईराणी मशिदीच्या शेजारी असणाऱ्या चहाच्या टपरीवर येणार असल्याची माहिती मिळाली.
मोहम्मद जाकिर याला अटक करण्यासाठी ‘स्पेशल २६’च्या पथकाने ‘ऑपरेशन आंबिवली ईराणी वाडी’ मोहीम हाती घेतली. मात्र ही मोहीम फत्ते करण्यासाठी पोलिसांना काळजी घ्यावी लागणार होती. कारण ईराणी वस्ती ही फार वर्षांपासून चोरांची वस्ती म्हणून कु-प्रसिद्ध आहे. या वस्तीत मोठमोठे गुन्हेगार वास्तव्यास आहेत. यावस्तीत गुन्हेगारांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर येथील महिला पुरुष हल्ले करून पोलिसांना पिटाळून लावतात. येथील महिला पुरुषांपेक्षा अधिक आक्रमक असून, त्या थेट पोलिसांच्या अंगावर येऊन आरोपीचा बचाव करीत असल्याच्या घटना घडल्या आहेत.
या सर्वांची खबरदारी घेऊन स्पेशल २६च्या पथकाला ही मोहीम फत्ते करायची होती. या वस्तीतल्या लोकांना कानोकान खबर लागू नये याची काळजी विशेष पथकाकडून घेण्यात आली होती.

पोलिसांची योजना काय होती?

आंबिवली गावात जाण्यासाठी दोन ॲम्बुलन्स, दोन प्रायव्हेट गाड्या, पिस्टल, लाठ्या, हातकडी सोबत ठेवूनच अंबिवलीत प्रवेश करायचा असं ठरलं. तसेच, गावाच्या बाहेर पोहोचल्यावर २६ जणांचे पथक  चार वाहने यांचे ३ पथकात विभाजन करायचे आणि ही पथके विविध ठिकाणी सापळा लावून बसतील आणि खब-याच्या माहितीनंतर एक मुख्य पथक आरोपीला उचलण्यासाठी अॅम्बुलन्ससह तेथे दाखल होईल. आरोपीला अंबुलन्समध्ये टाकताच इतर पथके या वाहनाला संरक्षण देत हद्दीच्या बाहेर पडतील, या मोहिमेदरम्यान ईराणी वस्तीतील लोकांनी विरोध केल्यावर पोलिसांचे ३ नंबर पथक हे लाठ्या काठ्याचा वापर करून हल्लेखोरांना रोखून ठेवतील,  अशी योजना आखण्यात आली होती.
 ४ फेब्रुवारी शनिवारी सायंकाळी पोलिसांचे स्पेशल २६ ची तीन पथके आंबिवलीच्या दिशेने अंबुलन्स मधून रवाना झाली. ठरल्याप्रमाणे, सर्व काही सुरळीत सुरु होते. पथकांनी आपापली पोझिशन घेतली  होती. गुन्हेगार मोहम्मद जाकिर हा देखील ठरल्याप्रमाणे चहाच्या टपरीवर ५ वाजता दाखल झाला होता. पोलिसांना खबर मिळताच २ नंबरचे पथक अॅम्बुलन्स घेऊन आरोपीला उचलण्यासाठी ईराणी वस्तीत दाखल होत असताना, वस्तीत पोलीस आल्याची खबर आरोपीला लागली आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा हा म्हणता संपूर्ण ईराणी वस्तीत पोलीस घुसल्याची खबर पसरली. तशी ईराणी वस्तीतील महिला पुरुष यांनी पोलिसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

….अन् अखेर मिशन झाले फत्ते

अशा परिस्थितीत पोलिसांनी मात्र आरोपी मोहम्मद ईराणी याचा पिच्छा न सोडता त्याला ताब्यात घेऊन अॅम्बुलन्सपर्यंत आणले. परंतू  वस्तीतील नागरिकांनी मोठ्या अॅम्बुलन्सच्या चालकावर हल्ला केला. दरम्यान, दुसरी लहान अॅम्बुलन्स आणण्यात आली व त्यात आरोपीला टाकण्यात आले. तातडीने अॅम्बुलन्स सुसाट पळवण्यात आली. पोलीस पथकातील अर्धे पोलीस अॅम्बुलन्समध्ये तर काही जण बाहेर लटकत होते, तर दुसरीकडे वस्तीतील लोक अंबुलन्सवर दगडांचा मारा करून अंबुलन्सला रोखण्याचा प्रयत्न करू लागले. दगडांचा मारा झेलत पोलिसांची अॅम्बुलन्स आरोपीला घेऊन  मुंबईच्या दिशेने सुसाट निघाली आणि ऑपरेशन आंबिवली ईराणी वाडी हे मिशन यशस्वी पार पडले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.