मुंबईच्या मुच्छड पानवाल्यासह १२ पान विक्रेत्यांना अटक; साडेतेरा लाख रुपयांचे ई सिगारेट जप्त

134

शहरासह उपनगरातील शाळा, कॉलेज परिसरात ई – सिगारेट, हुक्का, तंबाखू विक्री करणाऱ्या पान विक्रेत्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मुंबईचा फेमस मुच्छड पानवाला याचा देखील समावेश असून मुच्छड पानवालाचा मालक शिवकुमार तिवारी याच्यासह १२ पान विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. या पान विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात ई – सिगारेट, हुक्का फ्लेवर्स जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली असून अटक करण्यात आलेल्या पण विक्रेत्यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

मुंबईत अल्पवयीन मुले, तसेच शाळा कॉलेजातील तरुणांमध्ये हुक्का आणि ई -सिगारेटचे व्यसन वाढू लागले आहे, ई सिगारेट तसेच हुक्का व त्याला लागणारी सामुग्रीची ऑनलाईन तसेच शहरातील लहान-मोठ्या पान विक्रेत्याकडे मोठया प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. ई सिगारेटवर भारत सरकारने बंदी आणलेली असताना मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या दोन दिवसापासून मुंबईतील पान विक्रेत्यांवर छापेमारी सुरु केली आहे.

शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल जवळील पान टपऱ्यांमध्ये तरुणांना ई-सिगारेट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची गोपनीय माहिती काढून वांद्रे, व्हि.पी. रोड, गावदेवी, काळाचौकी अशा ४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटकडून कारवाई करण्यात आली. व्ही.पी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेतवाडी येथे असलेल्या प्रसिद्ध मुच्छड पान सेंटरवर छापेमारी करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ई सिगारेट आणि हुक्का फ्लेवर्स मिळून आले आहे. मुच्छड पान सेंटरचा मालक शिवकुमार तिवारी याला अटक करून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने क्रॉफर्ड मार्केट येथील एका गोदामाची माहिती पोलिसांना दिली असता त्या ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करून मोठ्या प्रमाणात ई सिगारेट आणि हुक्का फ्लेवर्स जप्त करण्यात आले आहे.

(हेही वाचा Shiv jayanti 2023: योगी सरकारच्या काळात शिवजयंतीच्या यात्रेत पोलिसांचा खोडा)

दरम्यान वरळी युनिट ने परळ एम.जी.एम. हॉस्पिटल जवळील संतोष पान बिडी शॉप, वांद्रे युनिटने पेरी क्रॉस रोडवरील गोल्डन बिडी शॉप, घाटकोपर युनिटने हिरोस् पान बिडी शॉप, आझाद मैदान युनिट यांनी मुच्छड पान सेंटर, खेतवाडी, तसेच आर.के. मंजिल, ओल्ड बंगालीपुरा, पायधुनी येथील गोदामावर छापा टाकून ९४७ नग (किंमत अंदाजे कि. १३,६५,२००/-रु.) ई-सिगारेट चा साठा जप्त करुन मुच्छड पानवाला सह १२ पान विक्रेत्यांच्या विरुद्ध कलम ७, ८ ई-सिगारेट प्रतिबंध कायदा २०१९, सह कलम २० (२) सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ अन्वये ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.