Deccan Queen : डेक्कन क्वीन थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या 

138
Deccan Queen : डेक्कन क्वीन थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या 
Deccan Queen : डेक्कन क्वीन थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या 
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन एक्सप्रेस कल्याण स्थानकात थांबली नाही म्हणून दोन तरुणांसह तिघांनी धावत्या एक्सप्रेस मधून उड्या टाकल्याची घटना शुक्रवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात घडली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Deccan Queen)
फरीद अन्सारी (२२) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असून रियाज (१९) आणि आणखी एक ४० वर्षीय अनोळखी प्रवासी हे दोघे जखमी झाले आहे. जखमी रियाज हा मृत फरीद याचा नातेवाईक असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. फरीद आणि रियाज हे दोघे मूळचे उत्तरप्रदेश राज्यात राहणारे आहेत. दोघे शुक्रवारी पहाटे पुण्याहुन डेक्कन क्वीन एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने निघाले होते, या दोघांना कर्जत येथे उतरायचे होते. परंतु, डेक्कन क्वीन एक्सप्रेसला कर्जतला थांबा नसल्यामुळे त्यांनी कल्याणला उतरण्याचा निर्णय घेतला. (Deccan Queen)
कल्याण स्थानकात ट्रेनचा थांबा नसल्याचे कळताच दोघे घाबरले. दोघांनी आणि तिसऱ्या सहप्रवाश्याने धावत्या एक्सप्रेस मधून कल्याण स्थानकाच्या फलाटावर उड्या टाकल्या, त्यात फरीद हा फलाटावरून एक्स्प्रेसच्या सापटीतून रुळावर पडला तर रियाज आणि सहप्रवाश्याला फलाटावरील लोहमार्ग पोलिस आणि प्रवाश्यांनी वाचवले. घटनास्थळी दाखल असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ तिघांना उपचारासाठी कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी फरीद याला तपासून मृत घोषित केले तर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अपमृत्यू नोंद केली असून तपास सुरू आहे. (Deccan Queen)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.