PIT NDPS Act रोखणार मुंबईतील बेकायदेशीर अंमली पदार्थांची तस्करी

97
PIT NDPS Act रोखणार मुंबईतील बेकायदेशीर अंमली पदार्थांची तस्करी
  • प्रतिनिधी 

मुंबईत होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस दलाकडून अंमली पदार्थ वाहतूक प्रतिबंधक कायद्याचा वापर करण्यात येत आहे. मुंबई पोलीसांच्या आरसीएफ पोलीस ठाण्याने या कायद्याअंतर्गत एका अंमली पदार्थ विक्रेत्याला दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनंतर मुंबई पोलिसांनी या कायद्याचा प्रथमच वापर करून अंमली पदार्थ तस्करांना स्थानबद्ध केले आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. (PIT NDPS Act)

अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत अंमली पदार्थ अवैध वाहतुकीला प्रतिबंध (पीआयटी एनडीपीएस ऍक्ट 1988) हा कायदा पूर्वीपासून लागू आहे. हा कायद्यात अंमली पदार्थ तस्करांना स्थानबद्ध करून दोन वर्षांसाठी त्यांना तुरुंगात डांबले जाते. या कायद्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे या कायद्याचा वापर यापूर्वी मुंबईत पोलीस ठाणे स्तरावर करण्यात आलेला नाही. पंजाबमध्ये अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाल्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा बसविण्यासाठी पंजाब पोलिसांनी या कायद्याचा वापर करून शेकडो अंमली पदार्थ तस्करांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करीवर आळा बसला आहे. (PIT NDPS Act)

(हेही वाचा – Baba Siddique Murder : मुंबईत पुन्हा गॅंगवॉर, दाऊद टोळी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता)

मुंबईत मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी सुरू आहे. या तस्करीवर आळा बसविण्यासाठी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत अंमली पदार्थ अवैध वाहतुकीला प्रतिबंध कायद्याचा वापर सुरू केला आहे. आरसीएफ पोलिसांनी या कायद्यांतर्गत पोलीस अभिलेखावरील सराईत ड्रग्ज तस्कर मोहम्मद इकलाख बशीर शेख उर्फ मोहम्मद इकलाख मोहम्मद इस्राईल शेख उर्फ मुसा उर्फ सलमान उर्फ अकलाख (३४) याच्यावर स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्कराला स्थानबद्ध करण्याची मुंबई पोलीस आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. (PIT NDPS Act)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद इकलाख विरोधात शहरात अंमली पदार्थ तस्करीचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर स्थानबद्ध कारवाई करण्यासाठी आरसीएफ पोलिसांनी मुंबई पोलीस आयुक्तांना प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्तांनी प्रस्ताव स्क्रिनिंग कमिटीला सादर केला. स्क्रिनिंग कमिटीने मान्यता देऊन हा प्रस्ताव गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला. गृह विभागाचे प्रधान सचिवांकडे स्थानबद्ध अधिकारी तथा प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांनी १५ ऑक्टोबरला आरोपी मोहम्मद इकलाख विरोधात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार, आरसीएफ पोलिसांनी आरोपी मोहम्मद इकलाख याला बुधवारी ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती तुरुंगात स्थानबद्ध केले. मुंबईत या कायद्याचा वापर करून मुंबईतील इतर पोलीस ठाणे आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ तस्करांना स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. (PIT NDPS Act)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.