इमारतीच्या पाईपवर ‘स्पायडर मॅन’ प्रमाणे चढून घरफोड्या करणाऱ्या दोन चोरांना मुंबईतील कांदिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. हे सराईत चोर पाईपवर सरसर चढून खिडकीतून घरात शिरून चोऱ्या करणात पटाईत होते.
चेतन राठोड आणि दीप पांचाळ अशी या ‘स्पायडर मॅन’ चोरांची नावे आहे. या दोघांनी पश्चिम आणि उत्तर उपनगरात घरफोड्या करून धुमाकूळ मांडला होता. १७ जून रोजी पहाटे १ ते ५ च्या दरम्यान कांदिवलीच्या अशोक नगर येथे एका इमारतीत घरफोडी झाली होती, या घरातून लाखो रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती.
कांदिवली पोलिसांनी या घरफोडीचा छडा लावण्यासाठी कंबर कसली आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज ताब्यात घेऊन फुटेज तपासले असता दोन जण इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाईपवरून सरसर चढत जाताना दिसले, हे दोघे खिडकीतून घरात शिरल्याचेही दिसुन आले. पोलीस पथकाने या दोघांची माहिती काढण्यासाठी खबऱ्यांचे जाळे पसरवले आणि या दोघांची माहिती मिळवली. खबऱ्याच्या माहिती वरून हे दोघे कांदिवली परिसरात एका ठिकाणी चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.
(हेही वाचा – Rajendra Shingne : राजेंद्र शिंगणे दादा गटाच्या वाटेवर; शरद पवारांना धक्का)
दोन दिवसांपूर्वी कांदिवली पोलिसांनी कांदिवली अशोक नगर परिसरात या दोन ‘स्पायडर मॅन’ चोरांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. या सराईत दोन ‘स्पायडर मॅन’ चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या दोघांना अटक करत त्यांच्याजवळचे सर्व चोरीचे दागिने जप्त केले असून या चोरांनी पश्चिम उपनगरात धुमाकूळ घातला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community