आंबिवली येथील ईराणी वस्तीतून एका खतरनाक गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून आणणाऱ्या ‘स्पेशल २६’च्या टीमचे पोलीस आयुक्तांनी कौतुक करीत त्यांना प्रशंसापत्र देऊन सत्कार केला आहे. बोरिवलीतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तसेच इतर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद असणारा खतरनाक गुन्हेगार मोहम्मद जाकिर उर्फ संगा सय्यद याला अटक करण्यासाठी परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांनी मालाड, बोरिवली, एमएचबी, चारकोप इत्यादी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांचे २६ जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या ‘स्पेशल २६’ पथकाने आंबिवलीतील ईराणी वस्ती येथून मोहम्मद जाकिर उर्फ संगा याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली.
‘ऑपरेशन आंबिवली ईराणी वस्ती’ हे यशस्वी करण्यासाठी या विशेष पथकाने टीमवर्क व कॉर्डिनेशन सांभाळत या वस्तीत घुसून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगावर दगडांचा मारा झेलत स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता धाडसाने खतरनाक गुन्हेगार मोहम्मद जाकिर याला अटक केली.
‘स्पेशल २६ ‘ या टीमने केलेल्या धाडसी कामगिरीची दखल खुद्द मुंबई पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त यांनी घेत बुधवारी या टीमचा पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ‘स्पेशल २६’च्या पथकातील प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार यांच्या धाडसाचे कौतुक करत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच सह पोलीस आयुक्त (कावसु) सत्यनारायण चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मानचिन्ह आणि संपूर्ण पथकाला एक लाख रुपये बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
(हेही वाचा – क्रॉस कनेक्शनमुळे उडाला पोलिसांचा असा गोंधळ)
Join Our WhatsApp Community