विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईच्या बाहेर बदली होऊन गेलेल्या १६१ पोलीस निरीक्षकांपैकी १५५ पोलीस (Police) निरीक्षकांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबईत पुन्हा बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये त्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर बदली झालेले १५५ पोलीस निरीक्षक मुंबईत परतले आहे. राज्य पोलीस दलातील अस्थापनाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबरला राज्यातील एकूण ३३३ पोलीस (Police) निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या सर्वाधिक १६१ अधिकाऱ्यांच्या मुंबई बाहेर बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबईतून गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, जालना, पालघर इत्यादी जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे हे अधिकारी नाराज झाले होते. यातील काही अधिकाऱ्यांनी मॅट आणि काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
(हेही वाचा CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिल्ली दौरा; महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या पोलीस (Police) महासंचालक रश्मी शुक्ला या पुन्हा परतल्यानंतर मुंबईबाहेर बदली झालेले अधिकारी पुन्हा मुंबईत परतण्याची आस लावून बसले होते. अखेर, राज्य पोलीस मुख्यालयाने बुधवारी २१५ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. मुंबईबाहेर बदली झालेले १५५ अधिकारी परत आले आहेत. तर, राज्य पोलीस दलातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, नागरी हक्क संरक्षण अशा विभागांमधून मुंबईत नियुक्ती करण्यात आलेल्या ११२ पोलीस निरीक्षकांपैकी ६० अधिकाऱ्यांच्या त्यांच्या स्वेच्छेने पुन्हा जुन्या नियुक्तीच्या ठिकाणी परत बदली करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community