Police : खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्यासाठी पोलिसांनीच ड्रग्जचे पाकीट हळूच टाकले खिशात;  खार पोलीस ठाण्याचे पथक निलंबित

212

सांताक्रूझ पूर्व कलिना येथे राहणाऱ्या एका तबेल्यातील ‘केअर टेकर’ ला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तबेला मालकाला अडचणीत आणण्याचा खार पोलिसांचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेराने हाणून पाडला आहे. या केअर टेकरला पकडल्यानंतर खार पोलिसांनी (Police) सोबत आणलेले एमडी ड्रग्जचे पाकीट केअर टेकरच्या खिशात टाकताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आणि पोलिसांचे हे कृत्य जनतेसमोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या फुटेजमुळे मुंबई पोलिसांची विश्वासाहर्ता पणाला लागली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्व कलिना या ठिकाणी असलेल्या एका तबेल्यात ३० ऑगस्ट रोजी साध्या वेशातील पाच ते सहा जण प्रवेश करतात, त्यापैकी एक पोलीस तबेल्यातील डॅनियल नावाच्या  केअर टेकरला  ताब्यात घेतात, साध्या वेषातील व्यक्ती स्वतःची ओळख पोलीस असे सांगून त्यातील एक व्यक्ती स्वतःच्या खिशातून एक पाकीट काढून झडतीच्या नावाखाली डॅनियलच्या खिशात टाकते, त्यानंतर झडतीत त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आल्याचे सांगून त्याला ड्रग्जची बेकायदेशीर विक्री करीत असल्याचा आरोप करून त्याला अटक करण्याची धमकी देते. हा सर्व प्रकार तबेल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद होतो. तबेल्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे, ही कल्पना तबेल्यात आलेल्या खार पोलिसांना (Police) देखील नव्हती.

(हेही वाचा Sunita Williams यांचा अंतराळात मुक्काम आणखी वाढला; कल्पना चावलाच्या अपघातामुळे नासाचा सावध पवित्रा)

पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह 

हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर खार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॅनियलला सोडण्यात आले. हा व्हायरल व्हिडियोमुळे खार पोलिसांचे कृत्य लोकांसमोर आले असून मुंबई पोलिसांची विश्वासार्हता पणाला लागली असून या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तक्रारदार यांना वरीष्ठ अधिकारी यांनी बोलावून त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात तसेच व्हिडीओमध्ये दिसणारे पोलीस हे खार पोलीस (Police) ठाण्याचे असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तबेला मालक शाहबाज खान यांना संपर्क केला असता त्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या जागेचा बिल्डरसोबत वाद असून या वादातून मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी खार पोलीस ठाण्याचे एटीसीचे पथक आले होते, त्यांनी डॅनियलकडे माझ्याबाबत विचारले, मी त्यांना भेटलो नाही म्हणून त्यांनी डॅनियलच्या मार्फत मला अडकविण्याचा प्रयत्न केला, डॅनियलच्या खिशात ठेवलेल्या ड्रग्ज प्रकरणी खारचे पथक डॅनियलला घेऊन खारदांडा येथील पोलिस चौकीत घेऊन गेले होते. मी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा डॅनियलला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पोलिसांनी ड्रग्ज खिशात टाकल्याचे समोर आले, मी जेव्हा हा व्हिडीओ संबंधित अधिकारी यांना दाखवला असता त्यांनी तात्काळ डॅनियलला सोडून दिले आणि मला फुटेज व्हायरल करू नये आणि डिलीट करावे यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला असे शहाबाज खान याने सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.