राज्यभरातील तुरुंगात शिक्षा भोगत असणारे कैदी तसेच न्यायप्रतीक्षेत असणाऱ्या कैद्यांना गादी आणि उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र गादी आणि उशी आणण्याची परवानगी केवळ ५० हून अधिक वय असणाऱ्या कैद्यांना देण्याचा निर्णय अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी कारागृह अधीक्षक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिला आहे.
( हेही वाचा : अभ्यासाच्या तणावामुळे बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या! पनवेलमधील धक्कादायक घटना )
राज्यातील कारागृह विभागातील अडचणी जाणून घेण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी राज्यभरातील उपमहानिरीक्षक,कारागृह अधीक्षकांची बैठक घेतली होती. ही बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत कारागृह हितासाठी काही निर्णय घेतले असून कारागृहातील समस्या तसेच कैद्यांच्या समस्येचा आढावा घेतला आहे. या घेतलेल्या आढाव्यात राज्यातील कारागृहांमध्ये ५० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेले कैदी बंदीस्त असतात त्यामध्ये काही वयोवृद्ध कैदी आजारी असतात या बाबींचा सारासार विचार करून ५० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन कैद्यांना जाड अंथरून तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला.
परवानगी देण्यात आलेल्या गादी आणि उशीची जाडी, रुंदी आणि लांबीचा आकार देण्यात आलेला असून गादीची लांबी साधारण १८३० सेंटिमीटर रुंदी ६१० सेंटिमीटर असणार आहे, व उशीचा आकार ४६×२३ सेंटिमीटर जाडी १० सेंटिमीटर पेक्षा जास्त असणार नाही. कैद्यांनी गादी आणि उशी स्वखर्चाने आणावी असा निर्णय घेण्यात आला आहे.