राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा ई मेल आयडी हॅक करुन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना ईमेल पाठविण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या अधिकृत ईमेल आयडीवरून राजभवनाच्या अधिकृत ईमेल आयडीवर ईमेल पाठविण्यात आला होता. या ईमेलमध्ये काही आमदार विधानसभेत नीट वागत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झालेल्या वादाचा संदर्भ देत आमदार दादा भुसे यांच्यासह अन्य एका आमदाराला लक्ष्य करण्यात आले होते. या ईमेलनंतर राजभवनच्या अधिकाऱ्यांनी सत्यता पडताळण्यासाठी तातडीने राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या वतीने याबाबत मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४१९ आणि १७० यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community