रेल्वे लोहमार्ग पोलीस शिपायांनी दरोड्याची योजना रचून साडेचार किलो सोन्याचे दागिने लंपास करण्याचा प्रयत्न ट्रॉम्बे पोलिसांनी हाणून पाडला आहे. याप्रकरणी दोन पोलिस शिपायांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दरोड्यातील सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्रभाकर नाटेकर (२९), विकास पवार (३०) आणि नितीन पाटील (२८) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. प्रभाकर नाटेकर आणि विकास पवार हे दोघे ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात शिपाई आहेत. नितीन पाटील हा विकास पवारचा बालपणाचा मित्र असून दोघे सांगली जिल्ह्यात राहणारे आहेत.
( हेही वाचा : गोराईतील त्या प्रकल्पबाधितांच्या इमारतींची होणार डागडुजी)
नितीन पाटील हा मंगलोर येथील सोन्याच्या व्यापाऱ्याकडे नोकरीला होता. मंगलोर ते मुंबई सोन्याचे दागिने व्यापाऱ्यांना पोहचविण्याची जबाबदारी व्यापाऱ्याने नितीनवर सोपवली होती. गेल्या आठवड्यात नितीन पाटील हा मंगलोर येथून साडेचार किलो वजनाचे सोन्याचे दागिने झवेरी बाजार येथील सराफांना देण्यासाठी येत असताना दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असता पोलिसांना ही चोरीची घटना बनाव असल्याचा संशय आला. पोलिसांनी पाटील याच्याकडे उलट तपासणी करून त्याच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स काढले. मागील काही आठवड्यांपासून विकास पवार हा पोलीस शिपाई सतत पाटील याच्या संपर्कात असल्याचे समोर आले. ट्रॉम्बे पोलिसांनी पाटीलकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत दागिने विकास पवारकडे ठेवल्याची कबुली देत चोरीची योजना पाटील आणि दोन पोलीस शिपाई नाटेकर आणि पवार या तिघांनी बनवली होती, त्यांनीच पाटीलला तशी तक्रार करण्यासाठी सांगून दागिने विकास पवारकडे ठेवण्यात आले होते.
ट्रॉम्बे पोलिसांनी नितीन पाटील, ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलीस शिपाई नाटेकर आणि विकास पवार या तिघांना अटक करून साडेचार किलो वजनाचे दागिने हस्तगत करण्यात केले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत २ कोटी ४७ लाख ५०हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community