चोरीला गेलेला मोबाईल फोन असा मिळवा परत!

143

मोबाईल फोन हा नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे अनेक जण मोबाईलपासून अधिक काळ दूर राहू शकत नाहीत. यापुढे तुमचा मोबाईल फोन चोरीला अथवा गहाळ झाल्यास चिंता करू नका, कारण चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून देणारे ‘वेब पोर्टल’ केंद्रीय दूरसंचार विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गहाळ झालेल्या मोबाईल फोनची माहिती टाकल्यावर, तुमचा मोबाईल फोन कुठल्या मोबाईल क्रमांकावर वापरला जातोय याची माहिती तुम्हाला उपलब्ध होते.

( हेही वाचा : गडबडलेले ‘गांधी’ )

‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’

सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री (सीईआयआर) या पोर्टलच्या मदतीने शहरातील चोरीला गेलेल्या मोबाईल फोनपैकी २० टक्के फोन यावर्षी परत मिळवून दिल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सीईआयआर पोर्टलचा वापर सुरू केल्यानंतर प्रत्येक पोलीस ठाण्याकडून दररोज किमान ५ ते ६ मोबाईल हँडसेट शोधले जात आहेत.

हे पोर्टल हाताळण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नागरिक जेव्हा फोन चोरीला गेल्याची तक्रार घेऊन त्यांच्याकडे जातात, तेव्हा ते ‘सीईआयआर’ पोर्टलवर त्याच्या सोळा आकडी ‘आयएमइआय’ क्रमांकाच्या मदतीने फोनची नोंदणी करतात.

त्यानंतर फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकला जातो आणि सर्व मोबाईल सिम कार्ड कंपन्यांकडे ती माहिती पोहचते. ब्लॅकलिस्टेड फोनमध्ये सिमकार्ड टाकले की लगेच ट्रेसिबिलिटी रिपोर्ट पोलिस आणि तक्रारदाराने पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो. आम्ही त्या नंबरवर कॉल करतो आणि वापरकर्त्याला फोन चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची माहिती देतो. संबंधित वापरकर्त्याला फोन परत करण्याबाबत विनंती केली जाते आणि अशाप्रकारे मोबाईल हँडसेट परत मिळतो असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक वेळा चोरीचा अथवा गहाळ झालेला मोबाईल हँडसेट वापरणाऱ्या व्यक्तीला याबाबत कुठलीही कल्पना नसते, कारण त्याने तो मोबाईल हँडसेट तिसऱ्याच व्यक्तीकडून स्वस्त दरात विकत घेतलेला असतो. अशावेळी आम्ही त्यांना परिस्थिती सांगून नजीकच्या पोलीस ठाण्यात मोबाईल हँडसेट जमा करण्याची विनंती करतो असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

दादर परिसरात राहणारे विकेश सेठ यांनी गेल्यावर्षी खरेदी केलेला महागडा मोबाईल फोन ते टॅक्सीमध्ये विसरले होते, त्यांनी टॅक्सी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र टॅक्सी चालक सापडला नाही. विकेश सेठ यांनी पोर्टलबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांनी पोर्टलवर हरवलेल्या मोबाईल हँडसेटचा आयएमईआय क्रमांक नोंदवला त्यानंतर त्यांचा फोन ब्लॅकलिस्ट करण्यात आला. दादर पोलीस ठाण्यात देखील सेठ यांनी फोन गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली होती. काही दिवसांनी सेठ यांच्या हरवलेल्या मोबाईल हँडसेटमध्ये नवीन सिमकार्ड टाकण्यात आल्यानंतर ताबडतोब त्यांच्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर त्याबद्दल माहिती आली आणि त्यांनी स्वतः टॅक्सी चालकाचा शोध घेतला. जेव्हा पोलिसांनी त्याला बोलावले तेव्हा त्याने ताबडतोब सेठ यांचा फोन त्यांना परत केला, अशी माहिती विकेश सेठ यांनी दिली आहे.

आरटीआयनुसार, २०१९ मध्ये, मुंबई शहरात चोरीला गेलेल्या किंवा हरवल्या गेलेल्या ४३,३९७ मोबाईल हँडसेटपैकी फक्त २,०८८ फोन परत मिळाले. २०२० मध्ये ३९,८१९ फोन चोरीला गेल्याची नोंद झाली, त्यापैकी १,९१६ फोन परत मिळाले. त्याचप्रमाणे, २०२१ मध्ये ५१,३०२ हरवलेल्या फोनपैकी फक्त ३,२३०फोन परत मिळाले आहेत. ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’ या पोर्टलच्या माध्यमातून यावर्षी चोरी झालेले मोबाईल हँडसेट परत मिळण्याचे प्रमाण वाढले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.