पुण्यातील कोयता गॅंगने मुंबईतील व्यापाऱ्यांवर कोयत्याने हल्ला करून लुटीचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी दादर टीटी येथे घडली. माटुंगा पोलिसांनी तिघांना जागेवर अटक केली असून चौथ्या आरोपीला साताऱ्यातून अटक करत मुंबईत आणण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले चौघे पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथे राहणारे राहणारे आहेत. अटक करण्यात आलेल्या चौघांकडून दोन महागड्या मोटारसायकल, कोयता आणि स्प्रे बॉटल हस्तगत करण्यात आले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्यावर सायन रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली असून शुक्रवारी चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली. (Koyta Gang)
गौरव राजेंद्र ढमाल (२३), ओमकार संपत घोलप (२३), तेजस कृष्णाजी जाधव (२४) आणि रणजित कुडाळकर असे अटक करण्यात आलेल्या कोयता गॅंगच्या (Koyta Gang) सदस्यांची नावे आहे. चौघेही पुण्यातील शिरवळ येथे राहणारे आहेत. बुधवारी रात्री सातारा येथून एक व्यापारी सोन्याची मोठी खेप घेऊन खाजगी बसने मुंबईकडे जाणार असल्याची माहिती कोयता गॅंगला मिळाली होती. या टोळीने या व्यापाऱ्याची माहिती काढून, तो कुठल्या बसने मुंबईकडे जाणार असल्याची संपूर्ण माहिती काढली, त्यानंतर या चौघांनी दोन मोटारसायकलवरून या बसचा पाठलाग सुरू केला. (Koyta Gang)
ही बस गुरुवारी पहाटे दादर टीटी सर्कल येथे आली. विजय निंबाळकर हा डिलिव्हरी बॉय बसमधून उतरला व जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पीत उभा असताना कोयता गॅंगचे चौघे सदस्य त्या ठिकाणी आले, त्यातील एकाने विजय निंबाळकर याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याच्या हातातील चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरडाओरड होताच, जवळच असणाऱ्या माटुंगा पोलीस चौकीतून पोलीस धावत आले आणि नागरिकांच्या मदतीने मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील एक जण तेथून पळून गेला. (Koyta Gang)
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन जखमी झालेल्या निंबाळकर याला उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, माटुंगा पोलिसांनी पळून गेलेल्या चौथ्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी त्याचा माग काढून सातारा येथून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे. चौथ्या आरोपीला घेऊन पोलिस पथक सातारा येथून निघाले असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली. पोलीस सूत्रांच्या म्हणण्या नुसार अटक करण्यात आलेले हल्लेखोर हे पुण्यातील कोयता गॅंगचे सदस्य आहेत, त्यातील एक आरोपी शिक्षण घेत असून दोघे जण खाजगी कंपनीत नोकरीला आहे. या टोळीकडून दोन महागड्या मोटारसायकल आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. (Koyta Gang)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community