गायक सोनू निगम यांच्या वडिलांच्या ओशिवरा येथील घरी घरफोडी झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. त्यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या नोकराने बनावट चावीचा वापर करून ७२ लाख रुपयांची रोकड लांबवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली.
अगमकुमार निगम (७६) असे सोनू निगम यांच्या वडिलांचे नाव असून अगमकुमार हे ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत एकटेच राहतात. त्यांची मुलगी निकिता आणि मुलगा सोनू निगम हे वर्सोवा येथे वेगवेगळ्या इमारतीत राहण्यास आहे. अगमकुमार यांना एका कामाचे ७२ लाख रुपये रोखीने आले होते, ती रोकड त्यांनी डिजिटल लॉकर आणि लाकडी कपाटातील लॉकरमध्ये वेगवेगळे ठेवले होते. १९ मार्च रोजी अगमकुमार हे दुपारी मुलीकडे जेवायला गेले होते, तेथून घरी परत आल्यानंतर त्यांनी रोकड तपासली असता लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेली ४० लाख रुपयांची रोकड मिळून आली नाही. अगमकुमार यांनी याबाबत मुलीला कळवले, दुसऱ्या दिवशी मुलगी निकिता आणि अगमकुमार हे सोनू निगम यांच्या घरी व्हिसाच्या कामासाठी गेले होते, तेथून घरी परत आल्यानंतर अगमकुमार यांनी डिजिटल लॉकर मधील रोकड तपासली असता त्यातील ३२ लाख रुपयांची रोकड मिळून आली नाही.
दरम्यान त्यांनी सोसायटीत असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात त्यांना ८महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आलेला रेहान हा वाहन चालक सीसीटीव्हीत दिसून आला.त्याच्या खांद्यावर एक बॅग होती, त्यानेच चोरी केली असावी या संशयावरून बुधवारी अगमकुमार यांची मुलगी निकिता हिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून रेहान चा शोध सुरू केला आहे.
Join Our WhatsApp Community