जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार करून आपल्या वरीष्ठ अधिकारी आणि तीन प्रवाशांना ठार करणारा आरपीएफ जवान चेतन सिंह हा रुळांवरुन पळत असतानाही रायफलमधून ट्रेनवर गोळ्या झाडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेतन सिंह याच्या स्कॉटिंग टीममध्ये असणाऱ्या एका सहकाऱ्याने बोरिवली रेल्वे पोलिसांना दिलेल्या जबाबात ही धक्कादायक माहिती दिली आहे. चेतन सिंह याच्याविरुद्ध बोरिवली रेल्वे पोलिसांनी रात्री उशिरा दाखल केलेल्या गुन्ह्यात त्याच्या विरुद्ध हत्या, शस्त्रबंदी कायदा तसेच भारतीय रेल कायदा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चेतन सिंह याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चेतन सिंह याच्या स्कॉटिंग टीममध्ये त्याचे वरिष्ठ एएसआय टिकाराम मीना, पोलीस हवालदार नरेंद्र परमार आणि पोलीस शिपाई अमय घनश्याम आचार्य हे चौघे होते. चेतन आणि टिकाराम हे दोघे बी/५ एसी बोगीत तर परमार आणि आचार्य यांची ड्युटी स्लीपर कोच मध्ये होती. ट्रेनमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपी पोलीस शिपाई चेतन सिंह याच्या स्कॉटिंग टीममध्ये असलेला सहकारी अमय आचार्य याची फिर्याद घेऊन चेतन सिंह विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान आचार्य याने बोरिवली रेल्वे पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती दिली. “नालासोपारा येथुन आरपीएफ मधील माझा बॅचमेन्ट कॉन्स्टेबल कुलदिप राठोड याचा फोन आला. त्याने मला सांगितले की, माझे टीम इंचार्ज एएसआय टिकाराम मिना यांचे वर फायरिंग झाली आहे. मी त्यास तुला हे कसे समजले, असे विचारले असता त्याने एसी कोचचा अटेन्डट के. के. शुक्ला याने त्यास थोड्या वेळा पुर्वी फोन वरुन कळविल्याचे सांगितले. मी ताबडतोब पोलिस हवालदार नरेंन्द्र कुमार यांना फोन वरुन कळवले व घाईघाईने बी/५ कोचच्या दिशेने जाऊ लागलो. त्यावेळी समोरुन दोन तीन पॅसेंजर धावत आले. ते घाबरलेले दिसत होते. त्यांनी देखील मला सांगितले की, माझ्यासोबत असणारे एएसआय टिकाराम मिना यांच्यावर माझा साथीदार पोशि. चेतन सिंह याने गोळीबार केला आहे.
मला समजलेली घटना मी फोन वरुन पोलिस हवालदार नरेंद्र परमार यास कळविली व तो सुरक्षित असल्याची खात्री करुन घेतली, आणि तात्काळ ही माहीती नियंत्रण कक्षाला देखील कळविली. असे आचार्य याने जबाबात म्हटले आहे, ते पुढे म्हणाले की, “मी धावत बी/५ कोच च्या दिशेने निघालो. मी बी/१ कोच मध्ये आलो असता समोरुन मला पोशि. चेतन सिंह येताना दिसला. त्याचे हातात रायफल होती व त्याचा चेहरा अजुनही रागावलेला दिसत होता. तो माझ्यावर फायरींग करु शकतो या विचाराने मी मागे फिरलो व स्लिपर कोचमध्ये येऊन थांबले. सुमारे १० मिनिटांनी कोणीतरी साखळी खेचून ट्रेन थांबबली. त्यावेळी मी ‘व्हेअर इज माय ट्रेन’ या अँपवर पाहिले असता मिरारोड व दहिसर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ट्रेन थांबल्याचे मला दिसले.
मी बोगीचा दरवाजा अर्धवट उघडुन बाहेर पाहिले असता समोरुन ट्रॅकवर उतरुन पोशि. चेतन सिंह येताना मला दिसला. त्याचे हातात रायफल तशीच होती व तो फायरिंग पोजिशन मध्ये होता. मी बोगीतील प्रवाशांना ओरडुन खिडक्या बंद करुन खाली पडुन राहण्यास सांगितले. मी चेतन सिंह याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो. चेतन सिंह याने रायफल ट्रेनच्या दिशेने ठेवली होती व तो ट्रेनच्या दिशेने गोळीबार करत होता. माझ्या कानावर गोळीबाराचे आवाज आले. मी थोडा वेळ एका बाथरुममध्ये लपुन राहिलो. थोड्या वेळाने बाहेर येऊन मी पाहीले असता चेतन सिंह ट्रॅक वरुन चालत मिरारोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असल्याचे मला दिसले. त्याचे हातात रायफल तशीच होती.” असे आचार्य याने बोरिवली रेल्वे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. आचार्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चेतन सिंह यांच्या विरोधात बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community