मागील दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सदिच्छा साने प्रकरणाचे गूढ उकलण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने गेल्या आठवड्यात संशयावरून अटक केलेल्या लाईफ गार्ड मिथ्थु सिंह याने गुरुवारी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदिच्छा साने हिची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याचे त्याने पोलिसांच्या चौकशीत कबुली दिली, गुन्हे शाखेकडून सदिच्छा हीचा मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.
विद्यार्थीनी १४ महिन्यांपूर्वी गुढरीत्या बेपत्ता झाली होती
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारी आणि मुंबईतील सर जे.जे. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या सदिच्छा साने ही विद्यार्थीनी १४ महिन्यांपूर्वी गुढरीत्या बेपत्ता झाली होती. तिचे शेवटचे लोकेशन हे मुंबईतील वांद्रे बँडस्टॅण्ड या ठिकाणी पोलिसांना मिळून आले होते. तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्यामुळे हे प्रकरण अखेर मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते, या प्रकरणात पोलिसांनी अनेकांची चौकशी केली होती, अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले होते.
१४ महिन्यांपासून बेपत्ता होती
गुन्हे शाखेच्या तपासात सदिच्छा ही शेवटची बँडस्टॅण्ड येथील लाईफगार्ड मिथ्थु सिंह याला भेटली होती व तिच्यासोबत त्याने सेल्फी देखील घेतली होती. अखेर १४ महिन्यांनी गेल्या आठवड्यात मिथ्थु सिंह आणि त्याचा सहकारी जब्बार या दोघांना संशयावरून अटक करण्यात आली होती, मात्र काही केल्या तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. अखेर गुरुवारी पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानेच सदिच्छा साने हिची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याचे पोलिसांच्या चौकशीत कबुल केले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने गुन्ह्याचा कलमात वाढ करून कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) वाढविण्यात आले आहे. १४ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सदिच्छा हीचा मृतदेह शोधणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
Join Our WhatsApp Community