संतोष वाघ
वांद्रे पश्चिम येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ या सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर तिहार तुरुंगात कैद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) हा मुंबई पोलिसांच्या रडारवर आला आहे. (Salman Khan House Firing) लॉरेन्स बिष्णोई याने गेल्या वर्षी सलमान खानला मारण्याची खुली धमकी दिली होती. त्यानंतर 2 वेळा सलमानला पत्र आणि ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोईकडे चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान रविवारी पहाटे सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने विविध पथके तयार करून मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईच्या दिशेने ही पथके रवाना करण्यात आलेली आहे.
(हेही वाचा – Iran Israel Attack : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांचा इशारा)
याआधीही २ वेळा आली होती धमकी
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने चार गोळ्या झाडून धूम ठोकली. गोळीबार झाला, त्या वेळी खान कुटुंब त्यांच्या निवासस्थानी होते. कडक पोलीस सुरक्षा असताना सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सलमान खान हा पंजाबचा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या निशाण्यावर असून लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून यापूर्वी सलमान खानला दोन वेळा धमकी देण्यात आली आहे. एकदा निनावी पत्रातून, तर एकदा ईमेलवरून धमकी देण्यात आली होती.
मी सलमान खानला मारेन – लॉरेन्स बिष्णोई
काळवीट प्रकरणावरून सलमान खान हा लॉरेन्स बिष्णोईच्या निशाण्यावर आला आहे. गेल्या वर्षी लॉरेन्स बिष्णोईला एका खंडणीच्या गुन्ह्यात खटल्यासाठी राजस्थानमधील जोधपूर न्यायालयात हजर रहाण्यासाठी पोलीस घेऊन जात असताना बिश्नोईने, “सलमान खानला येथे जोधपूरमध्ये मारले जाईल… त्यानंतर, त्याला आमची खरी ओळख कळेल… आता, जर पोलिसांना माझ्याकडून काही मोठा गुन्हा करायचा असेल, तर मी सलमान खानला मारेन आणि तेही जोधपूरमध्ये”, अशी खुली धमकी दिली होती.
मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात
रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि गुन्हे शाखा गोळीबार करणाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार वांद्रे पोलिसांना गोळीबार करणाऱ्यांनी ज्या मोटरसायकलचा वापर केला, ती मोटारसायकल वांद्रे माउंट मेरी रोड येथे मिळाली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.
गोळीबार करणाऱ्यांनी वापरलेली मोटारसायकल वांद्रे येथे सोडून दुसऱ्या वाहनाने दहिसरच्या दिशेने पळ काढला असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची विविध पथके वसई, नालासोपारा, ठाणे आणि नवी मुंबई या शहरामध्ये या दोघांचा शोध घेत आहेत. त्याच बरोबर तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोईकडे या गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची मदत घेत आहे. (Salman Khan House Firing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community