शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांच्याविरोधात मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी हा गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील कामठी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. धमकी देणे व शांतता भंग कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी लावण्यात आलेले पोस्टर फाडण्यात आले होते. या दरम्यान ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला थेट इशारा देत, रात्री पोस्टर्स काढणे सुरू ठेवल्यास शिवसैनिक दिवसा प्रत्युत्तर देतील, असा इशारा एका व्हिडीओ माध्यमातून देण्यात आला होता.
(हेही वाचा-Devendra Fadnavis : तत्व हाच प्राण आणि विचारांशी इमान हे बाळासाहेबांच्या राजकारणाचं मुख्य सूत्र !)
या कथित धमकीला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाने निर्मल नगर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर कारवाई करत मुंबईतील निर्मल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो सोलापूरच्या कामठी पोलिसांकडे वर्ग करण्याचे काम सुरू आहे.
झोन-८ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची पुष्टी केली. दीक्षित म्हणाले की,”हा व्हिडिओ सोलापूरमधून अपलोड करण्यात आला होता आणि या संदर्भात एका व्यक्तीने गुरुवारी निर्मल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, या तक्रारवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु कोळी यांचा व्हिडीओ सोलापूर जिल्हयातील कामठी येथून व्हायरल झाल्यामुळे हा गुन्हा कामठी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे.