लालबाग हत्याकांडात धक्कादायक खुलासा; मृतदेहाचे तुकडे घरातच जाळ्याचा प्रयत्न

Shocking revelation in Lalbaug murder case: try burnt to the body pieces in the house
लालबाग हत्याकांडात धक्कादायक खुलासा; मृतदेहाचे तुकडे घरातच जाळ्याचा प्रयत्न

लालबाग हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे, वीणा जैन हिच्या मृत्यू नंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी एक नाही तर दोन इलेक्ट्रिक मार्बल कटरचा वापर करण्यात आला आहे. तसेच पुरावा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मुलगी रिम्पलने आईच्या शरीराचे तुकडे जाळण्याचा, शिवाय ऍसिडने नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना यासंबंधीत घटनास्थळी अर्धवट जळालेला गाऊन (मॅक्सी) आणि आणखी एक मार्बल कटर मिळून आले आहे. रिम्पलने ज्या दुकानातून या वस्तू खरेदी केल्या होत्या त्या दुकानात जाऊन पोलिसांकडून खात्री करण्यात आली असल्याचे समजते आहे.

महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून झाला होता मृत्यू

लालबाग येथील इब्राहिम कासम चाळीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या वीणा जैन या ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह १४ मार्च रोजी काळाचौकी पोलिसांना पाच तुकड्यात आणि कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मागील तीन महिन्यांपासून आईच्या मृत तुकड्यासोबत राहणारी मुलगी रिम्पल (२४)ला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. वीणा जैनची हत्या केली नसून तिचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला या जबाबावर रिम्पल ठाम आहे. २७ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वीणा जैन घराबाहेर असलेल्या शौचालयात जात असताना  तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या, त्याच वेळी त्याच चाळीत राहणाऱ्या एका हॉटेल कर्मचारी याने रिम्पलला आई खाली पडल्याची माहिती दिली, आणि रिम्पलने त्या कर्मचाऱ्याच्या मदतीने आई वीणाला घरी घेऊन आली होती. त्यावेळी वीणा हिची कुठलीही हालचाल होत नव्हती, म्हणून तिला घरी घेऊन येणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याने  नातेवाईकांना कळव असे रिम्पलला सांगितले. परंतु तू जा मी बघते काय करायचे ते असे बोलून हॉटेल कर्मचारी याला जाण्यास सांगून दार लावून घेतले असा जबाब वीणा जैनला घरी घेऊन आलेल्या हॉटेल कर्मचारी याने पोलिसांना दिला आहे.

मुलीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केले अनेक प्रयत्न

आईच्या मृत्यू प्रकरणी आपल्याला जवाबदार धरतील म्हणून रिम्पलने मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि आई कुठेतरी निघून गेली असे सांगून स्वतःचा बचाव करायचा असे ठरवले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली, त्यानंतर तिने त्याच दिवशी घरापासून काही अंतरावर असलेल्या एका हार्डवेअरच्या दुकानातून मार्बल कटर, कोयता इत्यादी वस्तू खरेदी केल्या. तसेच ऍसिड, फिनाईल हे देखील ती घेऊन आली होती. २७ डिसेंबर रोजीच रिम्पल हिने आईचा मृतदेहांचे तुकडे करण्यास सुरुवात केली, काही तुकडे केल्यानंतर मार्बल कटरने कट होत नसल्यामुळे तिने काही दिवस मृतदेह तसाच ठेवून दिला. ३१ डिसेंबर रोजी पुन्हा रिम्पलने दुसरा कटर त्याच दुकानातून घेऊन आली व तिने आईच्या मृतदेहाचे पाच भागात तुकडे करून ते तुकडे घरातील मोरीत ठेवून आईचीच मॅक्सी जाळून त्या तुकड्यावर टाकली होती, तुकडे जळत नसल्याचे बघून तिने अर्धवट जळालेली मॅक्सी विजवून, आणलेल्या ऍसिड टाकून तुकडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा तो प्रयत्न देखील अयशस्वी झाला नाही.

(हेही वाचा – लालबाग हत्याकांड : लखनौमधून एकाला घेतले ताब्यात, मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी मदत केल्याचा संशय)

अखेर तिने आईचे धड प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी घरातील कपाटात ठेवली व इतर अवयव स्टीलच्या पिंपात टाकून पिंप बंद करून ठेवला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान पोलिसांना अर्धवट जळालेली मॅक्सी, एॅसिडची बॉटल आणि आणखी मार्बल कटर घरात मिळून आले आहे. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार, या सर्व घटनेत रिम्पलने कुणाचीही मदत न घेता, हे सर्व एकटीने स्वतः केले असल्याचे समोर येत आहे. रिम्पलने या गुन्ह्यासाठी ज्या दुकानातून वस्तू आणल्या होत्या, दुकानात खात्री करण्यासाठी शनिवारी पोलिसांनी रिम्पलला दुकानात आणले होते आणि तिने वस्तू खरेदी केलेले दुकान पोलिसांनी दाखवले असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here