धक्कादायक: पुण्यात 100 रुपयांसाठी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला

97

पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पाषाण भागात अवघ्या 100 रुपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 2 जणांना अटक केली असून, 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण भागात ही घटना घडली होती. या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी झाला असून आशुतोष माने यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे आणि गौरव गौतम मानवतकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

( हेही वाचा: #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन )

नेमके काय घडले?

तक्रारदार आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयूर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षदा या हाॅटेलमध्ये जेवण केले. दरम्यान, त्या ठिकाणी मोटार सायकलवरुन 2 मुले आली आणि त्यांनी मयूर आणि पंकज यांच्याकडे 100 रुपयांची मागणी केली. पण, पंकजने मात्र पैसे नसल्याचे सांगितले. या मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलावून पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.