महिला आणि तरुणींना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची आखाती देशात तीन ते पाट लाख रुपयांत विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई जवळील मीरारोड येथे समोर आला आहे. महिलांची तस्करी करणारे रॅकेट मुंबई ठाण्यात कार्यरत असून या रॅकेटमध्ये महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मीरारोड येथे राहणाऱ्या एका ज्युनिअर आर्टिस महिलेला मस्कत येथे नोकरीच्या नावाखाली पाठवून तिची तीन लाख रुपयांमध्ये विक्री करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने गेल्याच आठवड्यात स्वतःची सुटका करून घेत मुंबई गाठून मीरा रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिला ही ४३ वर्षाची असून ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून फिल्मसिटी येथे काम करीत होती. मीरारोड येथे मुलीसह राहणाऱ्या पीडित महिलेला फिल्मसिटीमध्ये काम मिळत नसल्यामुळे तिने एका नोकरीच्या संकेतस्थळावर परदेशात नोकरीसाठी अर्ज केला होता. काही दिवसांनी या महिलेला नमिता नावाच्या महिलेचा फोन आला तिने नोकरी संदर्भात माहिती देऊन ऑफिसला भेटायला न बोलवता पीडित महिलेला अंधेरी मेट्रो स्थानक या ठिकाणी भेटायला बोलावले. त्याठिकाणी अशरफ नावाचा व्यक्ती आणि त्याच्यासोबत नमिता हे दोघे भेटले. ओमान देशात नोकरी असल्याचे सांगून त्यांनी तिचा पासपोर्ट घेतला आणि काही दिवसांनी मस्कत येथे नोकरी असल्याचे सांगून पीडित महिलेला मस्कत येथे पाठवले.
(हेही वाचा – पोलिसांची बनावट ओळखपत्रे बनवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न)
मस्कत विमानतळावर एक तरुण पीडित महिलेला घेण्यासाठी आला होता, त्यानंतर या महिलेचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला आणि तिला एका बंगल्यात आणण्यात आले. त्या बंगल्यात अगोदरच काही भारतीय तरुणी आणि महिला होत्या. पीडित महिलेला संशय येताच तिने एका महिलेकडे विचारपूस केली असता नोकरी वैगेरे काही नाही, या ठिकाणी भारतीय महिलांना फसवून आणून त्याची तीन ते पाच लाखात विक्री करून त्यांना वेश्या व्यवसायात लोटले जात असल्याची माहिती या महिलेने दिली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच पीडित महिलेने मुंबईत अशरफ याला फोन लावला. मात्र, त्याने तो फोन उचलला नाही. अखेर या महिलेने मस्कत येथे राहणाऱ्या काही ओळखीच्या लोकांना फोन करून स्वतःची सुटका करून घेत भारतात परतली. इकडे आल्यानंतर तिने काशीमीरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. काशीमीरा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आणि महिलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा शोध घेत आहे.
Join Our WhatsApp Community