सात लाख रुपयांसाठी मुंबईतून ऊसतोड मजूराचे अपहरण, कर्नाटकातून आरोपीला अटक

175

७ लाख रुपयांसाठी एका ऊसतोड मजूराचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी सलग एक महिना अपहरण कर्त्यांचा पाठलाग करून कर्नाटक राज्यातून एका अपहरण कर्त्याला अटक करून अपहरण करण्यात आलेल्या ऊसतोड मजुराची सुखरूप सुटका केली आहे.

( हेही वाचा : लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० जागा जिंकणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा)

रमेश काळे (४५) असे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. रमेश काळे हा मजूर मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील धानोरे गावात राहणारा आहे. मागील काही वर्षांपासून तो आपल्या रमेश काळे पत्नी मुलांसह मुंबईतील करीरोड मॅरेथॉन फ्युचरेक्स समोर असणाऱ्या फुटपाथवर राहतो व तिथेच फुलविक्रीचा धंदा करतात.

महिन्याभरापूर्वी बापू प्रल्हाद चव्हाण आणि विलास चव्हाण हे दोघे एका अनोळखी व्यक्तीसह रमेश काळे राहत असलेल्या फुटपाथजवळ आले व अनोळखी व्यक्ती हा रमेश काळे याच्याकडे गेला आणि फुलांची मोठी ऑर्डर असल्याचे सांगून त्याला सोबत घेऊन चव्हाण पितापुत्र बसलेल्या मोटारीजवळ घेऊन आला,व रमेश काळे याला बळजबरीने मोटारीत बसवून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी मयुरी चव्हाण हिने रमेश काळे याच्या पत्नीला फोन करून तुझा पती आमच्या ताब्यात असून त्याच्या सुटकेसाठी ७ लाख रुपये घेऊन ये नाही तर तुझ्या पतीला जीवे मारू अशी धमकी दिली.

याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिमंडळ ३चे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंभार, गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक तांबोळी,अंमलदार भुरे, गायकवाड, सोनवणे, राठोड आणि पाटकर या पथकाने मोबाईल फोनवरून अपहरणकर्त्याचा माग काढला असता अपहरणकर्ते सांगली, येथून कर्नाटकातील बेळगाव येथे गेल्याची माहिती मिळाली.

तब्बल २० दिवसाच्या पाठलगनंतर पोलीस पथकाने कर्नाटक येथून संतोष अर्जुन काळे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत रमेश काळे याला सांगलीतील जत येथे एका खोलीत डांबून ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी जत तालुक्यातील एका खेड्यातून रमेश काळे याची सुटका केली, मात्र इतर आरोपींनी पोलीस येण्यापूर्वी तेथून पळ काढला होता. पोलिसांनी रमेश काळे यांची सुटका करून मुंबईत आणण्यात आले, अपहरणकर्त्यांनी एक महिना त्याला डांबून ठेवत त्याला मारहाण करीत होते अशी माहिती सुटका करण्यात आलेल्या रमेश काळे यांनी पोलिसाना दिली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश काळे हा ऊसतोड मजूर आहे, आणि अपहरणकर्ते ऊस तोड मजुरांचे मुकादम आहेत. रमेश काळे याने कुटुंबासह ऊस तोडीची आगाऊ ७ लाख रुपयांची रक्कम आरोपी यांच्याकडून घेतली होती. काही दिवस ऊसतोडीचे काम करून तो पत्नी मुलांसह मुंबईत पळून आला होता. आगाऊ रक्कम घेऊन काम पूर्ण न केल्यामुळे अपहरण कर्त्यांनी पैसे वसुलीसाठी रमेश काळे याचे अपहरण केले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.