मुंबई – संतोष वाघ
उजव्या हाताच्या खांदयात बंदुकीची गोळी घुसली, संपूर्ण खांदा रक्तबंबाळ होऊनही खांदयाला शर्ट बांधून त्याने कर्नाटक ते मुंबई असा १३ तासांचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात या तरुणांच्या खांदयातील गोळी काढण्यात आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुनील बिपई प्रसाद प्रजापती (२४) असे या तरुणाचे नाव आहे. जखमी सुनील प्रजापतीचे मित्र रेहान खान, राम आशिष पटेल यांनी २३ जुलै रोजी सुनीलला प्रथम उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखम असल्यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणले. परंतु, बंदुकीची गोळी खांद्यात अडकल्यामुळे तेथून त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कळवा आणि केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी गोळी कशी लागली याबाबत चौकशी केली असता, बदलापूर पूर्व येथील डोंगराच्या कडेला पनवेल हायवे जवळील ढाब्याजवळ असणाऱ्या मैदानात दारू पीत बसलेले असताना त्या ठिकाणी दोन अनोळखी इसमांमध्ये भांडण सुरू होते. दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुनील प्रजापतीवर एकाने गोळी झाडली आणि पळून गेले अशी माहिती जखमी तरुणाच्या मित्रांनी दिली. याबाबत बदलापूर पोलिसांना कळविण्यात आले. बदलापूर पोलिसांनी याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तिंविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, बदलापूर येथे जखमी सुनील प्रजापती आणि त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी कुठलीच घटना घडली नसल्याचे समोर आले. पोलिसांना याबाबत संशय येताच त्यांनी दोन्ही मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
२१ जुलै रोजी जखमी सुनील व त्याचे मित्र कर्नाटक मार्गे तेलंगणा राज्यात गेले होते. त्या ठिकाणी एका डोंगराळ भागात तिघे दारू पीत बसलेले असताना राम आशिष पटेल याच्याकडे असलेले पिस्तुल हाताळत असताना त्यातून चुकून गोळीबार झाला आणि एक गोळी सुनील प्रजापतीच्या उजव्या खांद्यात घुसून सुनील जखमी झाला. या घटनेमुळे तिघे ही घाबरले व कर्नाटकात आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी मुंबईला निघायचे ठरवले. मात्र, पिस्तुलाची गोळी खांद्यात घुसल्यामुळे सुनीलचा उजवा खांदा पूर्णपणे रक्ताने माखला होता आणि तो वेदनेने तडफत होता. त्याला वेदना सहन होत नव्हत्या, मित्रांनी सुनीलला तेथील रुग्णालयात घेऊन न जाता त्याला वेदना जाणवू नये यासाठी भरपूर दारू पाजली व नशेत ठेवले. त्यानंतर सुनीलच्या जखमेच्या ठिकाणी शर्ट बांधून त्याला सोबत घेऊन त्याच रात्री कर्नाटक येथून मुंबईकडे जाणारी ट्रेन पकडली.
(हेही वाचा – Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती, तब्बल 378 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले)
ट्रेनमध्ये कुणालाही कळू नये म्हणून तिघेही जनरल डब्ब्याच्या शौचालयाजवळ बसले. प्रवासात सुनीलला जेव्हा जेव्हा वेदना होत होत्या तेव्हा तेव्हा हे दोघे त्याला दारू पाजत होते. सुनील नशेत असल्यामुळे त्याला वेदना जाणवत नव्हत्या. तब्बल १३ तासांच्या प्रवासानंतर हे तिघे कल्याण रेल्वे स्थानकावर उतरले व थेट उल्हासनगर येथील सेंटर रुग्णालय गाठले. बदलापूर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून त्याची अधिक चौकशी करून त्यांची झडती घेतली असता दोघांकडे ३ पिस्तुल, ६ मॅगझीन आणि २१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे तिघे पिस्तुल विकण्यासाठी कर्नाटक येथे गेले होते. मात्र, ही घटना घडल्यामुळे तिघेही मुंबईकडे रवाना झाले. बदलापूर पोलिसांनी दोन्ही मित्रांना अटक केली असून सुनील प्रजापती याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community