Thane - Drugs Seized : ठाण्यात वडवली खाडी किनारी झिंगाट, पोलिसांनी उतरवली नशा, ९५ जणांसह ८ लाखांचा अमली पदार्थ जप्त
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील वडवली खाडी किनारी आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे (Thane – Drugs Seized) पोलिसांनी छापा टाकला. या दरम्यान डीजेच्या तालावर नशेत झिंगणाऱ्या ९५ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जवळपास ८ लाख रुपए किमतीचे नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्व १८ ते २५ वयोगटातील तरुण असून त्यात ५ तरुणीचा समावेश आहे.
एकीकडे राज्य सरकार राज्य नशा मुक्ती करण्याच्या प्रयत्नात असून राज्यात अमली पदार्थ विरोधी मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवाया सुरू असून हजारो कोटींचे अमली पदार्थ राज्यभरात जप्त करण्यात आलेला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असताना ठाण्यात मात्र रेव्ह पार्ट्या, हुक्का पार्लर, डान्सबार यांना ऊत आला आहे.
Video Player
Media error: Format(s) not supported or source(s) not found
ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने शनिवारी पहाटे ३ वाजता कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडवली खाडी किनाऱ्यावर सुरू असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. ही रेव्ह पार्टी नवतरुणांसाठी दोन आयोजकांकडून आयोजित करण्यात आली होती. या रेव्ह पार्टीत वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ, मद्य, हुक्का मोठ्या प्रमाणात सर्व्ह केले जात होते. डीजेच्या दणदणाट आणि तालावर नशेत बेधुंद झालेली तरुणाई थिरकत होती.
गुन्हे शाखेच्या छापेमारीत नशेत बेधुंद असलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पार्टीत विक्रीसाठी ठेवण्यात आलेले ७० ग्रॅम चरस, ०.४१ ग्रॅम एलएसडी, २.१० ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स २०० ग्रॅम, गांजा , बिअर, वाईन, व्हिस्की, हुक्का, असा एकूण ८ लाख ३ हजार रुपयांचा नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळावरून गांजा ओढण्याचे साहित्य साधने, डीजे मशिन, २९ मोटार सायकली इ. साहित्य मिळुन आले. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आयोजकांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस आयुक्त शोध १ निलेश सोनावणे,गुन्हे शाखा घटक ५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहा पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, अविनाश महाजन, पोउपनि तुषार आणि पथकाने केली.
गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर स्थानिक पोलीस ठाण्यावर बोट ठेवले जात आहे, एवढ्या मोठ्या पार्टीचे आयोजन सुरू होते, पहाटेपर्यंतडीजे चा दणदणाटात ही पार्टी सुरू होती याची स्थानिक पोलिसांना याची कल्पना नव्हती का असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारले जात आहे.