ठाणे मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला कारागृहात गादी, टेलिव्हिजन, घरचे जेवण आणि इतर सुविधा हव्या आहेत, यासाठी त्याने न्यायालयाकडे अर्ज करून या सुविधांची मागणी केली अन्यथा आपण उपोषणाला बसू अशी धमकी या सराईत गुन्हेगाराने दिली आहे. न्यायालयाने या गुन्हेगाराचा अर्ज फेटाळून लावला आहे.
( हेही वाचा : मध्य रेल्वे कर्नाक उड्डाणपुलाचा उल्लेख असणाऱ्या शिळा जतन करणार! पहा फोटो )
गुड्डू मोहिउद्दीन शेख उर्फ मुन्ना (३०) हा कुख्यात गुन्हेगार २०११ पासून सक्रिय आहे, त्याच्यावर खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात आहेत. २०१३ मध्ये त्याला कुर्ला येथून एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली गेली. शिक्षा कापून येण्यापूर्वी त्याने इतर गुन्ह्यात जामीन मिळविला. पाच वर्षांनी बाहेर आलेल्या गुड्डू हा पुन्हा आपल्या टोळीसह सक्रिय झाला होता. २०१९मध्ये बोरिवलीच्या एमएचबी पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केली आणि पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली.
गुड्डूवर २०पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, त्याने पत्नीच्या माध्यमातून मोक्का न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता, त्यात त्याने त्याला भायखळा कारागृहात हलवावे किंवा ठाणे कारागृहातील हॉस्पिटल वॉर्डमध्ये शिफ्ट करावे, अशा दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. या दोन मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर त्याला ठाणे कारागृहातील बॅरेक मध्ये झोपण्यासाठी गादी, टेलिव्हिजन संच, घरचे जेवण आणि त्या सोबत डिश आणि इतर गोष्टीच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने त्याच्या या मागण्या मान्य न करता त्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दहा वर्षांपासून कारागृहातील आत बाहेर करणारा गुड्डू इतर कैद्यांना तसेच कारागृह कर्मचाऱ्यांना मारहाण करीत असतो, गेल्या आठवड्यात त्याला मोक्का न्यायालयात हजर करताना त्याने एका पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली होती, याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.
Join Our WhatsApp Community