छत्रपती संभाजीनगर दंगलीतील आरोपींना पोलीस करणार फरार घोषित 

85

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात रामनवमीच्या पूर्वसंध्येला राम मंदिरासमोर दोन गटात वाद झाला होता. दरम्यान यावेळी जमलेल्या जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांची जाळपोळ केली होती. त्यामुळे या प्रकरणी पोलिसात 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून पोलिसांकडून अटकसत्र सुरु आहे. पण अनेक आरोपी पोलिसांना सापडत नाही, तर काही जखमी आरोपी घरातच उपचार घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता गायब झालेले आणि सापडत नसलेल्या आरोपींना पोलिसांकडून फरार घोषित केले जाणार आहे. तर यासाठी 12 जणांची यादी बनवण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 मार्चला किराडपुरा भागात दोन गटात वाद झाला. सुरुवातीला क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद पोलिसांनी मिटवला होता. पण त्यानंतर अचानक गल्लीबोळातून शेकडोंचा जमाव घटनास्थळी आला. जमावाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वाहने देखील पेटवून देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले असून, आरोपींना पकडण्यासाठी 22 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ज्यात आतापर्यंत 63 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर यात 11 अल्पवयीन निष्पन्न झाले असून, पाच अल्पवयीन मुलांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. तर 63 पैकी दोघे पोलीस कोठडीत असून, उर्वरित 61 जणांची न्यायालयाने हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. परंतु ओळख पटलेले पण पोलिसांच्या हाती लागत नसलेल्या आरोपींना आता फरार घोषित करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी 12 लोकांची यादी देखील तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा राज्य सहकारी बँक घोटाळा : ईडीच्या आरोपपत्रात तूर्तास अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे नाव नाही)

एसआयटीकडून तपास सुरु

छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या राड्याप्रकरणी सखोल चौकशीसाठी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापना केली आहे. ज्यात सिडको ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे एसआयटीचे प्रमुख आहेत. सहाय्यक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, उत्रेश्वर मुंडे, रोहित गांगुर्डे, बाळासाहेब आहेर, कल्याण शेळके, अंमलदार अरुण वाघ, सुनील जाधव आदींचा एसआयटीमध्ये समावेश आहे. तर या पथकाकडून सखोल चौकशी केली जात असून, याचा अंतिम अहवाल पोलीस आयुक्तांना दिला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.