भारतीय नागरिकांना अरब देशात नोकरी करण्यासाठी सर्वात अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे अनेक बांगलादेशी नागरिक भारतात येऊन एजंटच्या मदतीने बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट व्हिसा बनवून अरब देशात नोकरीसाठी जातात, यासाठी त्यांना ७० ते ८० हजार रुपये एजंटला द्यावे लागतात. सैफअली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी अटक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याला देखील अरब देशात नोकरीसाठी जायचे होते, यासाठी त्याला पैशांची नितांत गरज होती म्हणून त्याने चोरीचा मार्ग निवडला होता अशी माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही, पोलिसांनी केवळ आरोपीला पैशांची नितांत गरज होती मात्र त्याला कशासाठी पैसे हवे होते हे स्पष्ट केले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Saif Ali Khan)
अभिनेता सैफअली खानच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने १६ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास प्रवेश करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास याने सैफअली आणि त्याच्याकडे नोकरी करणारी स्टाफ नर्स यांच्यावर चाकूने हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर पळून गेलेल्या मोहम्मद शरीफुल याला मुंबई पोलिसांनी रविवारी ठाण्यातून अटक केली. अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शरीफुल यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. अटक आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून १२ वी पर्यत शिक्षण झालेला शरीफुल हा ६ महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात बांगलादेश येथून जलमार्गाने मुंबईत घुसखोरी करून आला होता. (Saif Ali Khan)
मुंबईत आल्यावर त्याने एका एजंटच्या मदतीने वरळी कोळीवाडा येथील जनता कॉलनी येथे भाडयाने राहू लागला होता, व तेथेच एका पब मध्ये हाऊसकिपीगचे काम करीत होता. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शरीफुल याला झटपट पैसा कमवायचा होता, मुंबईत राहून तो अधिक पैसे कमवू शकत नसल्यामुळे त्याला पैसा कमावून श्रीमंत होण्यासाठी अरब देशात जायचे होते, त्यासाठी त्याला स्वतःचे भारतीय असल्याचे कागदपत्रे तयार करून भारतीय पासपोर्ट बनवायचे होते, परंतु त्यासाठी त्याला ७० ते ८० हजार रुपये खर्च येणार होता, पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी त्याने ज्या पब मध्ये नोकरी करीत होता त्या ठिकाणी एका ग्राहकाची हिऱ्याची अंगठी चोरली होती, परंतु ही चोरी उघड झाल्यामुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आले होते. (Saif Ali Khan)
त्याला लवकरात लवकर अरब देशात नोकरीसाठी जायचे होते, त्यासाठी त्याला पैशांची नितांत गरज होती अखेर त्याने मोठा हात मारण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला, पश्चिम उपनगरातील वांद्रे परिसरात त्याने आठवडाभर रेकी केल्यानंतर चोरी करण्यासाठी सद्गुरू शरण ही इमारत निवडली होती अशी माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल याला भारतात येण्यास मदत करणारा तसेच त्याला अरब देशात पाठविण्यासाठी मदत करणार होता या एजंटचा पोलिस कसून शोध घेत असल्याचे समजते. (Saif Ali Khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community