मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी १९ वर्षीय कॉलेज तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चेंबूर चुनाभट्टी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चुनाभट्टी पोलिस ठाण्यात दोन इसमांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
नेमकी घटना काय?
मुज्जबिल शेख (१९) असे या कॉलेज तरुणाचे नाव असून मुज्जबिल हा आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असून चुनाभट्टी येथील एका कॉलेजात शिकत होता. गुरुवारी सायंकाळी मुज्जबिल हा कॉलेजच्या मैत्रिणींसोबत घरी पायी जात असताना कॉलेजपासून काही अंतरावर मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेले. या घटनेमुळे घाबरलेल्या मुज्जबिल याच्या मैत्रिणींनी आरडाओरडा करताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुज्जबिल याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community